क्रीडा क्षेत्राला चालना देण्याबरोबरच चांगले खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा मंडळे व क्लब कार्यरत राहिले पाहिजेत, तसेच तालुका पातळीवर प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करु, अशी हमी नूतन जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी दिली.
चोरमले यांनी आज सकाळी जिल्हा क्रीडाधिकारी पदाची सुत्रे प्रभारी म्हणून काम पाहणारे क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांच्याकडून स्वीकारली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या तीन वर्षांपासून हे पद रिक्त होते. चोरमले हे गडचिरोली येथून बदलून आले. ते पूर्वाश्रमीचे खो-खोपटू, तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी भंडारा, पुणे व रायगड येथे जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सुत्रे स्वीकारताना त्यांचे क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर, कीडाधिकारी नंदू रासने, बाळासाहेब हंगे आदींनी स्वागत केले. यावेळी इंटरनॅशनल मास्टर शार्दूल गागरे, त्याचे वडील डॉ. अण्णासाहेब गागरे, क्रीडा शिक्षक शौकत शेख, रावसाहेब बाबर, प्रविण शिर्के, संदेश भागवत, गफार शेख आदी उपस्थित होते.
नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रश्नाची माहिती घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगताना त्यांनी संकुलाचे उत्पन्न वाढले तरच तेथे विविध उपक्रम राबवणे शक्य होणार आहे, देखभालीचा खर्च भागला तरच काही करणे शक्य होणार आहे. जिल्ह्य़ात पाथर्डी, राहुरी व श्रीरामपूर या तीन ठिकाणी अद्याप तालुका क्रीडा संकुलास जागा मिळालेली नाही, तेथे पुढील वर्षांत बांधकाम सुरु करण्याचा प्रयत्न राहील. ग्रामीण खेळाडूंसाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण केंद्रे सुरु करणे आवश्यक आहे, त्यासाठी शाळांशीही समन्वय साधला जाईल. राज्य सरकारची महत्वाची स्पर्धा स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पुढील महिन्यात नगरला होत आहे, ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.