येथील शाळा न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच अन्य मागण्यांबाबत सोमवारी (दि. २६) बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा शहरातील एस.एफ.एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर पीटर अमोलिक यांनी दिला.
शिक्षण उपसंचालकांसह सर्व संबंधितांना त्यांनी या संदर्भात निवेदन पाठविले. दरम्यान, फादर अमोलिक यांच्या निवेदनाची दखल घेत त्यांच्या मागण्यांबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी व उपोषणापासून त्यांना परावृत्त करावे, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी गुरुवारी जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना बजावला.
एस.एफ.एस. शिक्षण संस्थेने केलेल्या बेकायदा निलंबनाविरुद्ध फादर अमोलिक यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १२ ऑक्टोबर २००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने न्यायोचित निर्णय दिला. मात्र, या निर्णयाची एस.एफ.एस. या संस्थेने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अमोलिक यांनी खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. त्यावरही खंडपीठाने संस्थेकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे निर्देशित केले आहे. शालेय व्यवस्थापनाने आपणावर बनावट, तथ्यहीन आरोप करून आपणास निलंबित केले. समिती नेमून माझ्यावरील आरोपांची चौकशी करून मला २२ ऑक्टोबर २००९ रोजी सेवा समाप्तीचे आदेश दिले. व्यवस्थापनाच्या या आदेशाविरुद्ध फादर अमोलिक यांनी शाळा न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले.
औरंगाबाद खंडपीठ व पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयान्वये एस.एफ.एस. शिक्षण संस्थेने आपणास १५ डिसेंबर २००८ ते आजतागायत नियमानुसार निर्वाह भत्ते व वेतन अदा केले नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा वारंवार अवमान केला, याकडे निवेदनात फादर अमोलिक यांनी लक्ष वेधले आहे. या बरोबरच इतरही अनेक मागण्यांवर निवेदनात प्रकाश टाकला आहे.