राज्य शासनाने दारिद्रय़रेषेखालील आणि दारिद्रय़रेषेवरील (पांढरी शिधापत्रिका धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा, या उद्देशाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. मात्र शासकीय व खासगी रुग्णालयाच्या अनास्थेमुळे योजनेच्या मूळ उद्देशाला तिलांजली मिळत आहे. या योजनेंतर्गत वैद्यकीय उपचार घेऊ इच्छिणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा श्रमजीवी संघटनेने निषेध केला असून ज्या खासगी रुग्णालयांनी या रुग्णास दाखल करण्यास नकार दिला, त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येईल, असे शासनाने जाहीर केले आहे. तथापि, खर्चीक उपचार, शस्त्रक्रिया व तपासण्यांसाठी अनेक शासकीय व खासगी रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे. शासन अथवा विमा कंपनीकडून अपेक्षित मोबदला मंजूर होत नसल्याने खासगी रुग्णालये कानाडोळा करण्याची भूमिका घेतात. या योजनेंतर्गत जनरल सर्जरी, ई-एनटी सर्जरी, ऑप्थाल्मॉलॉजी सर्जरी, गायनॅकॉलॉजी अ‍ॅण्ड ऑब्सटेट्रिक्स सर्जरी, ऑथरेपेडिक सर्जरी अ‍ॅण्ड प्रोसिजर्स, सर्जिकल गेस्ट्रो एन्टोरॉलॉजी, पेडिएट्रिक सर्जरी, कार्डियाक, न्यूरोसर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, प्लास्टिक सर्जरी आदी शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. पण, जिल्हा शासकीय रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालय आवश्यक सोयी-सुविधा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्याचे कारण पुढे करते तर खासगी रुग्णालयात रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीवर बरीचशी गणिते अवलंबून असतात, याचा आजवर अनेकांनी अनुभव घेतला आहे. त्र्यंबकेश्वर येथील मौजे देवगांव येथील भाऊ श्रावण वारे याला किडनीचा आजार झाला होता. दारिद्रय़रेषेखालील असल्याने त्याने या योजनेचा लाभ घेण्याकरिता शहरातील रुग्णालयाकडे धाव घेतली. दोन दिवसांपूर्वी शासनाने मान्यता दिलेल्या साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट, लाइफ केअर, शताब्दी, सिक्स सिग्मा या रुग्णालयात फिरून दाखल करून घेण्याबाबत संबंधिताशी चर्चा केली. त्यांच्या प्राणांतिक वेदनेचा विचार न करता बहुतेक रुग्णालयात २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी केला आहे.
खासगी रुग्णालय दाद देत नसल्याने सोमवारी दुपारी तो अखेर संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाला. मात्र या ठिकाणी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होत असताना त्याचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांचा हलगर्जीपणा तसेच अनास्थेमुळे वारे यांचा हकनाक बळी गेला असल्याचा आरोप नातेवाईक तसेच संघटनेने केला आहे.
ज्या रुग्णालयांनी रुग्णास दाखल करण्यास नकार दिला, त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, संदर्भ सेवा रुग्णालयात मृत्यू होऊनही वारे यांचे शवविच्छेदन न करता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचा खुलासा करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.