सरत्या वर्षांअखेरीस टंचाई स्थितीने भीषण रूप धारण केले. जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत असले, तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. पाणीपुरवठय़ाची सुमारे ७ कोटींची देणी थकीत आहेत. पैकी प्रशासनाला ३ कोटी उपलब्ध झाले आहेत. जनावरांच्या चारा डेपोवर ऑगस्टपर्यंत ३ कोटी २३ लाख खर्च झाले. सध्या जिल्ह्य़ात ३३पैकी केवळ दोन चारा डेपो कार्यान्वित आहेत.
अवर्षण स्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. पाणीपुरवठय़ाचे सर्वच स्रोत आटले असल्याने बहुतांश ठिकाणी असलेल्या मृत साठय़ांमधून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. या पाश्र्वभूमीवर नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १५.१७ लाख, विंधन विहिरींसाठी १७.०१, विंधन विहिरी अधिग्रहण १७.८०, टँकरद्वारे पाणीपुरवठय़ावर ४१५.९४, खासगी विहीर अधिग्रहणावर ३०५.२९ लाख असा एकूण ७ कोटी ७१ लाख ८८ हजार रुपये खर्च झाला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर देणी थकीत असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ३ कोटी उपलब्ध करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पिण्याच्या पाण्याबरोबर जिल्ह्य़ात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. पशुपालकांच्या मागणीवरून जिल्ह्य़ात ३३ ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात आले. त्यावर १५ ऑगस्टपर्यंत ३ कोटी २३ लाख खर्च झाला. भूम तालुक्यातील तिंत्रज व अंभी या दोनच ठिकाणी चारा डेपो सुरू आहेत. त्यातच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न सर्वत्र निर्माण होत असल्याने जिल्ह्य़ात छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उस्मानाबाद शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. योजनेची ४ किलोमीटर अंतराची जलवाहिनी व इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यास शहराची तहान भागू शकणार आहे. योजनेसाठी ५१ कोटींचा निधी सरकारने मंजूर केला. यातील २५ कोटी उपलब्ध करण्यात आले. रक्कम मंजूर करताना ही योजना कोणत्याही स्थितीत दोन महिन्यांत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे ‘उजनी’चे पाणी केव्हा मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहेत. योजना लवकरात लवकर कार्यान्वित न झाल्यास शहराचा टँकरवरील खर्च मात्र आणखी वाढणार आहे. सध्या जिल्ह्य़ात १२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकजण खासगी टँकरचे पाणी घेऊन कशीबशी वेळ मारून नेत आहेत. परिणामी, टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांचा व्यवसाय मात्र तेजीत आहे.