* कसाऱ्याहून लोकलच्या वेळेनुसार सप्तशृंग गड बस
* जनता बससेवा सुरू करणे किंवा शहर बससेवेचा विस्तार
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसव्दारे प्रवास करणाऱ्यांच्या अनेक समस्या दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. याशिवाय लवकरच मुंबईकडून कसाऱ्यापर्यंत लोकलने येणाऱ्या भाविकांना शिर्डी आणि सप्तशृंग गडापर्यंत नेण्यासाठी कसाऱ्याहून लोकल रेल्वेच्या वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लवकरच परिवहन महामंडळाच्या नाशिक आणि ठाणे विभागामार्फत कसारा रेल्वे स्थानकातून इगतपुरी, घोटी, सिन्नरमार्गे शिर्डी आणि कसारा स्थानकापासून वणी, सप्तशृंग गडाकरिता लोकल रेल्वेच्या वेळेवर बस व्यवस्था करण्यात येणार आहे.
इगतपुरी आगाराच्या वतीने घोटीमार्गे नाशिकच्या जुन्या सीबीएससाठी तसेच त्र्यंबक ते नाशिक, निमाणी स्थानक ते सिन्नर आणि जुन्या सीबीएस स्थानकातून क्रमश: दिंडोरी, वणी, निफाड, लासलगावसाठी शहर बससेवेचा मार्ग वाढविण्याचा प्रस्ताव आहे. किंवा या मार्गावरील खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कमी प्रवासी भाडे असलेली जनता बससेवा सर्व ठिकाणांहून सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत दर तासाला सुरू करणे हा दुसरा पर्याय आहे.
कमी वेळेत आणि कमी भाडय़ात ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुविधेसाठी थेट नाशिक ते अकोला अशी बससेवा दर दोन तासाला सुरू करण्याचेही निर्देश आहेत.
जिल्ह्य़ातील प्रवाशांची अनेक वर्षांची गैरसोय दूर करण्यासाठी सर्व बस स्थानकांवर प्रवाशांची चढ-उतार करण्याविषयी राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांकडून नाशिक जिल्हा विभाग नियंत्रकांना आदेश देण्यात आले आहेत. यापुढे नाशिकहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या सर्व जिल्ह्य़ांच्या जलद, अतिजलद आणि साध्या बस चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, घोटी, इगतपुरी, शहापूर येथील स्थानकांवर थांबून प्रवाशांची चढ-उतार करतील. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सद्यस्थितीत अनेक गाडय़ा ओझर, घोटी, इगतपुरी यांसारख्या ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांना महामार्गावर येऊन ये-जा करणाऱ्या प्रत्येक बसला हात द्यावा लागतो. तरीही अनेक गाडय़ा थांबत नाहीत. धावत्या बसच्या चालकाचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उभे असणारे प्रवासी रस्त्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वच स्थानकांवर बस उभ्या राहणार असल्याने हा धोका दूर होणार आहे. जे चालक व वाहक अशा स्थानकांवर बस उभी करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश आहेत. पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला होता. नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड हेही कित्येक दिवसांपासून या विषयाचा पाठपुरावा करीत होते.