राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने परीक्षेतील मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना वाढीव दैनिक भत्ता आणि महागाई भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला निकाल घोषित करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर्षीतर प्राध्यापकांच्या आंदोलनाचा जबर फटका विद्यार्थ्यांच्या निकालाला बसला आहे. मात्र मूल्यांकनाच्या कामात गती आणून लवकरात लवकर निकाल जाहीर होईल, याची जबाबदारी घेण्याऐवजी दैनिक भत्ता, महागाई भत्ता किंवा प्रवास भत्त्यात वाढ कशी होईल, याकडेच प्राध्यापकांचे लक्ष असते. सदस्य विधिसभेत तसा ठराव मांडतात वित्त व लेखा समिती तशी शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करते आणि व्यवस्थापन परिषदही वाढीव भत्त्यांना सहज मान्यता देत असल्याचे चित्र दरवर्षीच दिसते. व्यवस्थापन परिषदेत मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना वाढीव दैनिक आणि प्रवास भत्ता मिळावा यासाठीच्या ठरावाला नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन सदस्यांनी होकार भरला. विधिसभा सदस्य डॉ. माधव वरभे आणि डॉ. नंदकुमार काळे यांनी विधिसभेत मांडलेल्या ठरावाबाबत वित्त व लेखा समितीने शिफारस केली. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
विधिसभा सदस्य डॉ. माधव वरभे यांनी मांडलेल्या ठरावानुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यापीठाच्या नागपुरातील मूल्यांकन केंद्रावर मूल्यांकनासाठी तसेच फेरमूल्यांकनासाठी येतात. मूल्यांकनासाठी तसेच फेरमूल्यांकनासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या प्राध्यापकांना गेल्या कित्येक वर्षांपासून सरसकट फक्त ११० रुपये दैनिक भत्ता दिला जातो. तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या प्राध्यापकांना प्रवास भाडे म्हणून त्यांच्या मूळ गावापासून ते नागपूर बस स्थानकामधील अंतराचे बसचे भाडे दिले जाते, पण बस स्थानकावरून मूल्यांकन केंद्रावर येण्यासाठी प्राध्यापकांना १०० ते १२० रुपये ऑटोला द्यावे लागतात. करीता मूल्यांकनासाठी दैनिक भत्ता २२५ करावा तसेच प्रवास भत्ता मूळगावाहून ते नागपूर बसभाडे १०० रुपये अनुषांगिक खर्च म्हणून देण्यात यावा, असेही ठराव डॉ. माधव वरभे यांनी मांडला होता. तर डॉ. नंदकुमार काळे यांनी महागाई भत्त्याचा ठराव मांडून काही मूल्यांकन केंद्रांवर १३० प्रमाणे तर काहीवर ११० प्रमाणे डीए दिला जातो. यामध्ये सुसूत्रता आणण्याची सूचना केली.
यादोन्ही ठरावाला मान्यता देत नियमानुसार निर्णय घेण्याचे निश्चित केले. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठातील विशेष समित्यांतील विषयतज्ज्ञ सदस्यांना बैठक भत्ता मंजूर करण्यात यावा, असा एक प्रस्ताव व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनीही सादर
केला होता.