‘अश्वेमध प्रतिष्ठान’, ‘स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती’ आणि ‘राज्याभिषेक समारोह संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ ते ५ मे या कालावधीत शिवकालीन इतिहासाशी निगडित प्रदर्शन तसेच दर्जेदार व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येथील गडकरी रंगायतनसमोरील श्रीराम व्यायामशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून जनकल्याण समितीला देण्यात येणार आहे. शिवकालीन शस्त्रे आणि पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याची माहिती उपलब्ध करून देणारे प्रदर्शन या वेळी मांडण्यात येणार आहे. तसेच ६० हून अधिक गड-किल्ल्यांचे मांडण्यात येणारे छायाचित्र आणि प्रतिकृतीच्या रूपातील प्रदर्शन रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. शिवरायांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचा देखावा रांगोळीच्या माध्यामातून या वेळी रेखाटण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नागरिकांना सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाहता येतील.
तसेच दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. १ मे रोजी दाजी पणशीकर ‘शिवरायांचे लोकनेतृत्व’, २ मे रोजी महेश तेंडुलकर ‘संताजी-धनाजी यांची शौर्यगाथा ’, ३ मे रोजी चंद्रशेखर नेने ‘शिवरायांची शासन पद्धती व स्त्री संरक्षण’  तसेच ४ मे रोजी पांडुरंग बलकवडे ‘श्री समर्थ रामदास स्वामी व शिवराय’ आणि ५ मे रोजी निनाद बेडेकर आणि प्र. के. घाणेकर ‘अपरिचित शिवराय – प्रकट मुलाखत’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Programs in thane on the occasion of maharashtra day
First published on: 01-05-2013 at 02:34 IST