जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा तालुक्यांत मानव विकास मिशन अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत विद्यार्थिनींना सायकली देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी न मिळाल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. परिणामी चालू शैक्षणिक वर्षांत विद्यार्थिनींची पायपीट कायम असल्याचे चित्र आहे.
हगोली, सेनगाव व औंढा या तीन तालुक्यांत मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे मानव विकासअंतर्गत शेती, आरोग्य, शैक्षणिक आदी उपक्रम राबविले जात आहेत. सोबतच नावीन्यपूर्ण उपक्रमाचा यात सहभाग आहे. या उपक्रमांमध्ये ज्या गावांत मानव विकासच्या बसगाडय़ा जात नाहीत, अशा गावांत, तसेच शाळेपासून किमान ५ किमी अंतरावरील गावांतील विद्यार्थिनींना सायकल देण्याची योजना मानव विकासअंतर्गत हाती घेण्यात आली. परंतु सायकली कोणत्या कंपनीच्या घ्यायच्या, या चच्रेचे गुऱ्हाळ वर्षभरापासून चालू असून यावर अजून एकमत होत नसल्याचे बोलले जाते.
या योजनेत सायकल खरेदीसाठी विद्यार्थिनींच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आला होता. तसेच लाभार्थी विद्यार्थिनींची यादीही तयार केली होती. यात सेनगाव ६०२, औंढा ६३० तर िहगोली तालुक्यात ६३९ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. निवड केलेल्या विद्यार्थिनींची यादीही तयार करण्यात आली. या विद्यार्थिनींच्या खात्यावर २ हजार रुपये भरले जाणार, तर उर्वरित १ हजार रुपये सायकल खरेदी केल्यानंतर देण्याचे ठरले होते.
चालू शैक्षणिक वर्षांत आता बारावीच्या परीक्षा जवळ आल्यामुळे लवकरच शाळांना सुटी राहणार आहे. त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरू होऊन शैक्षणिक सत्र संपेल. साहजिकच विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ मिळण्याची शक्यता दुरापास्तच दिसते. शिक्षण विभागाने चालू वर्षांत विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी घाईत प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी मानव विकास मिशनच्या आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. प्रस्ताव सादर करून सुमारे दोन महिने उलटले, तरी आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नाही.