नगर : पाथर्डी शहरासह तालुक्यातील वाढत्या करोनारुग्ण संख्येमुळे दि. ६ ते १६ मेपर्यंत संपूर्ण तालुक्यात जनता  संचारबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय आज, मंगळवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. या काळात किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद राहणार आहे. दूध विक्रेत्यांना एका जागी उभे राहून विक्री करता येणार नाही.

पाथर्डी तहसील कार्यालयात या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण होते. तहसीलदार शाम वाडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नायब तहसीलदार पंकज नेवसे, गटविकास अधिकारी शीतल खिंडी, तालुका आरोग्याधिकारी भगवान दराडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळी, डॉ. जगदीश पालवे, नगरसेवक महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ आदी उपस्थित होते.

तालुक्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्याच्या उपाययोजनांचा उपयोग होत नसल्याने कडक टाळेबंदी करण्याशिवाय पर्याय नाही, अशी सूचना तहसीलदार शाम वाडकर यांनी मांडल्यानंतर सर्वानी त्याला पाठिंबा दिला. सद्य परिस्थितीत शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, दूध विकण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र या वेळेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमा होत असल्याने करोनारुग्णांची संख्या आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दि. ६ ते १६ मेपर्यंत जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून या कालावधीत आता दूध विक्रेत्यांना एकाच ठिकाणी थांबून दूध विक्री करता येणार नाही तर किराणा दुकाने व भाजीपाल्याची दुकानेही लावता येणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र औषध दुकाने, दवाखाने व रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार असली, तरीही दुकानात औषधे वगळता इतर वस्तू विकता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.