पद्मशाली समाजाच्या दोन गटांतील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. सेना आमदार अनिल राठोड यांनी एका गटाची बाजू घेतल्यामुळे हा वाद चिघळला असून पोलीस तक्रारी, गुन्हा दाखल होणे, उपोषण, शाळा इमारतीची तोडफोड यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ व देवस्थान ट्रस्ट यांच्यातील या वादात राठोड यांनी देवस्थान ट्रस्टची बाजू घेतली आहे. देवस्थान ट्रस्टच्या जागेत मंडळाचे मरकडेय विद्यालय आहे. ती जागा ट्रस्टला खाली करून पाहिजे आहे. राठोड यांच्या माध्यमातून त्यासाठी ट्रस्टचे प्रकाश येनगंदूल व अन्य काहीजण आक्रमक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात मंडळाचे पदाधिकारी शरद क्यादर, विलास पेद्राम व त्यांचे सहकारी न्यायालयीन लढाई करत आहेत. सहायक धर्मादाय आयुक्तांनी शाळेच्या इमारतीचा ताबा देवस्थान ट्रस्टला घेण्यास मनाई केली होती.
तरीही तसा प्रयत्न झाला असल्याची पोलीस तक्रार क्यादर यांनी केली. त्यावरून कोतवाली पोलिसांनी राठोड, येनगंदूल यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. टी. पवार यांच्यावर ते दरोडेखोर, भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले. तसेच क्यादर यांनीच शाळा इमारतीची तोडफोड केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडले. सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल बोरूडे, तसेच अन्य नगरसेवक, सेना पदाधिकारीही त्यासाठी मोर्चाने पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक पवार यांना निलंबीत करा अशीही मागणी त्यांनी केली.
पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे स्वत: कोतवाली पोलीस ठाण्यात आले व त्यांनी राठोड यांच्याशी चर्चा केली. मात्र, क्यादर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करत राठोड व त्यांच्या बरोबरच्यांनी उपोषणच सुरू केले. त्यानंतर घुगे यांनी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून घुगे यांनी राठोड यांना सांगितले की क्यादर यांच्याबाबतची तक्रार लेखी स्वरूपात द्या, त्याची चौकशी ४८ तासांत करू, दोषी आढळल्यास कारवाई करू. त्यांच्या या आश्वासनानंतर राठोड यांनी उपोषण थांबवले.
दुपारी क्यादर यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोड यांच्यावर ते खोटे बोलत असल्याचे आरोप केले. ३० तारखेला सायंकाळी साडेसात वाजता स्वत: राठोड, येनगंदूल ५० ते ६० जणांच्या टोळक्यासह शाळेजवळ उभे होते. आपण स्वत:, तसेच विलास पेद्राम यांनी त्यांना सहायक धर्मादाय आयुक्तांचा मनाई हुकूम आहे असे सांगितले. मात्र, ते न ऐकता त्यांनी कुलूप फोडले, दरवाजे खिडक्या तोडल्या. मध्ये पडून असे करू नका म्हणून सांगत असताना धमक्या दिल्या, त्यामुळेच कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे ते आगपाखड करत आहेत, असे क्यादर यांनी पत्रकारांना सांगितले.
विद्यार्थी भयभीत, शिक्षकांचे निवेदन
दरम्यान, मरकडेय विद्यालयातील सर्व शिक्षकांनी दुपारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. शाळेसंबंधात सुरू असलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले असून हा प्रकार थांबवा अशी विनंती त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक शिंदे यांनी मात्र या ‘शिक्षकांनाच तुम्ही यात पडू नका, जमावबंदी आदेश असताना तुम्ही असे एकत्र कसे काय आलात’ म्हणून खडसावले. ‘पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत, तुम्ही घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करा’ असे त्यांनी सांगितल्यावर काही ज्येष्ठ शिक्षकांनी या प्रकारांमुळे विद्यार्थी शाळेतच येत नाही, असे शिंदे यांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
पद्मशाली समाजाच्या दोन गटांतील वाद चिघळला मरकडेय शाळेतील शिक्षक, विद्यार्थी भयभीत
पद्मशाली समाजाच्या दोन गटांतील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. सेना आमदार अनिल राठोड यांनी एका गटाची बाजू घेतल्यामुळे हा वाद चिघळला असून पोलीस तक्रारी, गुन्हा दाखल होणे, उपोषण, शाळा इमारतीची तोडफोड यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

First published on: 04-12-2012 at 04:37 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quarrel gets warm between two groups of padmashali samaj