बाभळवाडी गट ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहलीवर गेलेले सदस्य गावात येताच एका गटाने जोरदार दगडफेक केली. काहींनी पोलिसांनाच अडविण्याचा प्रयत्न करीत दगडफेक केल्यामुळे गोंधळ उडाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकारानंतर ही निवड रद्द करण्यात आली. शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर सरपंच पदाच्या निडणुकीत मात्र राडा झाला.
जिल्ह्य़ात ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. सरपंच निवडीत मात्र संघर्ष उफाळून आला. तालुक्यातील बाभळगाव, बेलेवाडी व बेडकुचीवाडी या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाची निवड सोमवारी होणार होती. या ग्रामपंचायतीत बाभळवाडीचे ३, बेलेवाडीचे २, बेडकुचीवाडीचे ३ व १ अपक्ष सदस्य निवडून आला. यात राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य असल्यामुळे सरपंच, उपसरपंचाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीसाठी बाहेरच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे अंतर्गत संघर्ष वाढला. निवडणुकीनंतर सर्व सदस्य सहलीवर गेले होते. सोमवारी सकाळी बाहेरचे लोक गावात येऊ नयेत, या साठी काही लोकांनी रस्ताच खोदण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविले असता पोलिसांवरच दगडफेक झाली. याच वेळी सहलीवर गेलेल्या सदस्यांचा ताफाही गावात आला नि दोन्ही गटांकडून परस्परावर, तसेच पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. दगडफेकीत ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल होऊन सायंकाळपर्यंत ६० लोकांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.