मालमत्ता कराच्या सुधारित सूत्राला सभागृहाची मंजुरी मिळविण्यासाठी पालिका प्रशासन आक्रमक झाले असून, तेवढय़ाच प्रखरतेने नव्या सूत्राला विरोध करीत भाजपने मालमत्ता कराबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील शीययुद्धाचा फायदा घेऊन नगरसेवकांना विकासनिधीपासून वंचित ठेवण्याची खेळी प्रशासनाकडून खेळण्यात येत आहे. परिणामी, विकासनिधीअभावी छोटय़ा-मोठय़ा नागरी कामांना खीळ बसून त्याचा थेट नागरिकांना फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडय़ा करू लागल्याने उभयतांमधील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. पालिकेने अंमलबजावणी केलेल्या मूल्याधारित मालमत्ता कर प्रणालीविरोधात काही मुंबईकरांनी न्यायालयात धाव घेत कराच्या सूत्राला विरोध केला होता. न्यायालयानेही मालमत्ता कराच्या सूत्रामध्ये सुधारणा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार प्रशासनाने मालमत्ता कराच्या सूत्रामध्ये सुधारणा केली. सुधारित सूत्राला मंजुरी मिळावी यासाठी त्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला. मात्र भाजपने विरोध केल्यामुळे शिवसेनेने नांगी टाकली आणि मालमत्ता कराच्या नव्या सूत्राचे सादरीकरण करण्याचे आदेश देत स्थायी समिती अध्यक्षांनी वेळ मारून नेली.
पालिका प्रशासनाने स्थायी समितीमध्ये आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समिती अध्यक्ष समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा होण्यापूर्वी नगरसेवकांना अधिकाधिक विकासनिधी मिळावा यासाठी प्रशासनाबरोबर वाटाघाटी करण्याची जुनी परंपरा पालिकेत आहे. मात्र मालमत्ता कराच्या सुधारित सूत्राला मंजुरी द्या, मग पाहू, अशी भूमिका प्रशासनाने सध्या घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही मालमत्ता कराच्या सुधारित सूत्राला विरोध करीत ताठर भूमिका घेतली आहे. प्रशासन आणि भाजप यांच्या कात्रीत शिवसेना सापडली आहे. भाजपच्या मदतीशिवाय मालमत्ता कराच्या सुधारित सूत्राच्या प्रस्तावाला मंजुरी देणे शिवसेनेला अशक्य आहे. तर हा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर नगरसेवकांना विकासनिधी मिळणे अवघड होणार आहे.
‘इकडे आड, तिकडे विहीर’
अशा स्थितीत शिवसेना
दरवर्षी नगरसेवकांना ६० लाख रुपये नगरसेवक निधी मिळतो. तसेच स्थायी समिती अध्यक्षांना प्रशासनाबरोबर वाटाघाटी करण्यात येणाऱ्या यशापयशानुसार नगरसेवकांच्या पदरात नगरसेवक निधी पडतो. गेल्या वर्षी ४० लाख रुपये विकासनिधी मिळाल्याने नगरसेवकांच्या पदरात एकूण एक कोटी रुपयांचा निधी पडला होता. मात्र सध्या मालमत्ता कराच्या प्रस्तावाच्या मंजुरीचा प्रश्न चिघळला आहे. भाजपने ताठर भूमिका घेत प्रस्ताव रोखून धरला आहे, तर प्रशासनाने प्रस्ताव मंजुरीसाठी शिवसेनेच्या मागे तगादा लावला आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा विचित्र स्थितीत शिवसेना अडकली आहे. विकासनिधी मिळवून देण्यात अपयश आल्यास नगरसेवकांचा रोष ओढवेल या भीतीने शिवसेनेचे पदाधिकारी गर्भगळीत झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
शिवसेना-भाजपमधील शीतयुद्धात विकासनिधीवर पाणी?
मालमत्ता कराच्या सुधारित सूत्राला सभागृहाची मंजुरी मिळविण्यासाठी पालिका प्रशासन आक्रमक झाले

First published on: 17-02-2015 at 06:15 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quarrels between shivsena bjp