राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्हा संघांतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. जिल्हा संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात एकही सभासद व कार्यकारिणीची एकही बैठक घेतली नाही, शिर्डी व रत्नागिरीच्या अधिवेशनाचा, तसेच संघटना संवर्धन निधीचा हिशेब दिला नाही, संघटनेत गटबाजी केली, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शिक्षक बँकेतच अधिक रस दाखविला, असा पलटवार शिक्षक नेते विष्णू खांदवे, बँकेचे अध्यक्ष गोकुळ कळमकर यांनी केला.
शिक्षक बँकेत सदिच्छा मंडळाने सत्ता प्राप्त केल्यानंतर बँकेचे संचालक मंडळ, खांदवे विरुद्ध सदिच्छा व संघाचे पदाधिकारी यांच्यात सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप, आंदोलने झडली. बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर ते काहीसे थंडावले. मात्र, अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा उफाळले आहेत. संघाचे राज्य पातळीवरील शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात एकत्र आले तरी जिल्हा संघातील दुफळी अधिकच वाढत चालली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब जगताप, सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष संजय शेळके, रा. वि. शिंदे आदींनी खांदवे गटावर अधिवेशनाच्या बोगस पावत्या फाडून ते शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना खांदवे गटाने आज पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला.
चार वर्षांपूर्वी राज्य संघात ओरास (सिंधूदुर्ग) येथील अधिवेशनात पाटील व थोरात गट अशी फूट पडली. दोघांच्या मनोमिलनासाठी पुन्हा ओरासला अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पावत्या बोगस फाडल्या जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. थोरात हे जिल्ह्य़ातील गटबाजीस प्रोत्साहन देत आहेत, थोरात गटाचे प्रतिनिधी बँक व संचालक मंडळाची बदनामी करत आहेत, संघाचे अध्यक्ष जगताप इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करतात, अशी तक्रार आळंदी येथील बैठकीत पाटील यांच्याकडे खांदवे गटाने केली. जिल्ह्य़ातील वस्तुस्थिती लक्षात घेऊनच पाटील यांनी खांदवे यांच्या नेतृत्वाखाली पावत्या फाडण्याचे काम करावे, असे सांगत पाटील यांनी खांदवे यांच्याकडे ५ हजार पावत्या सुपूर्त केल्या, खुद्द शिक्षक नेत्यांनीच दिलेल्या पावत्या बोगस कशा, असा सवाल करत कळमकर, उपाध्यक्ष गहिनीनाथ शिरसाट व इतरांनी पावत्या बोगस आहेत, तर आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान जगताप गटास दिले आहे.
यावेळी शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, दत्तात्रेय राळेभात, सुनील गिरमे, रविंद्र पिंपळे, गोरख वाघमोडे, राजेंद्र कुदनर, भाऊसाहेब वाकचौरे, माधव हासे, बाबा आव्हाड, सुरेश खेडकर, अनिल टकले आदी उपस्थित होते.    
२००१ पासूनची चौकशी सुरू
शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालकांच्या पावणेदोन वर्षांतील कारभाराच्या विरोधात सदिच्छातील अंतर्गत विरोधक, गुरुकुल, ऐक्य यांनी एकत्र येत सहकार खात्याकडे तक्रारी केल्या. त्याची चौकशी जिल्हा उपनिबंधकांनी सुरु केली. त्यास शह देण्यासाठी विद्यमान संचालकांनी संघाचे जिल्हाध्यक्ष जगताप बँकेचे अध्यक्ष असल्यापासून व नंतरच्या काळातील गुरुकुल व ऐक्यची सत्ता असतानाच्या काळातील गैरकारभार व भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या, त्यामुळे बँकेची सन २००१ पासूनच्या कारभाराची चौकशी जिल्हा उपनिबंधकांनी सुरु केली आहे, त्यासाठी पाच जणांची समिती नियुक्त केली आहे.