निवडणुकांच्या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर मोठा विपरित परिणाम होत आहे. मंत्रालय, महापालिका तसेच अन्य जीवनावश्यक खात्यांमधील कर्मचारीही या कामासाठी घेण्यात आल्याने सध्या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ‘आनंदीआनंद’ आहे. मात्र दैनंदिन सुरक्षेची आवश्यकता भासणाऱ्या रेल्वेवरही निवडणुकीच्या कामाची ‘कृष्णछाया’ पडली आहे. गंभीर बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या देखभालीवर या काळात विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अर्थात देखभालीतील त्रुटी प्रवाशांच्या जिवावरही बेतू शकतात.
लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडूनही अनेक कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक, कॅरेज अॅण्ड वॅगन्स, अशा विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या देखभालीचे काम करतात. सध्या उन्हाळी सुटय़ांचा मोसम असल्याने मध्य रेल्वेवर विशेष गाडय़ाही चालवल्या जात आहेत. त्यामुळे देखभालीसाठी येणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावल्याने त्याचा परिणाम गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीवर होऊ शकतो.
२३ डब्यांच्या एका गाडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी चार ते पाच तास लागतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. हा कालावधी वाढला, तर गाडय़ा रवाना होण्यास दिरंगाई होईल. गाडय़ा वेळेत रवाना करायच्या झाल्यास, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीत तडजोड करण्याशिवाय कर्मचाऱ्यांसमोर पर्याय नाही. मात्र अशी तडजोड हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याने कर्मचारी पूर्ण देखभाल केल्याशिवाय गाडी रवाना करत नाहीत. परिणामी येत्या काळात या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
देखभाल दुरुस्तीशी निगडित कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावण्याऐवजी इतर विभागातील कर्मचाऱ्यांबाबत हा विचार करता आला असता. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी व्यक्त केली.
परिणाम काय होणार?
या गाडय़ा दुरुस्तीच्या कामांसाठी २५ लोकांची एक ‘गँग’ असते. ही गँग एका पाळीत २३ डब्यांच्या दोन गाडय़ांची दुरुस्ती व देखभाल करते. सध्या या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या गँगमध्ये फक्त १७-१८ कर्मचारीच राहिले आहेत. त्यामुळे आधीच या विभागांवर ताण पडतो. निवडणुकीच्या कामासाठी या विभागांतील ३०० पैकी ७० लोकांना पाठवण्यात आल्याने आता प्रत्येक गँगमधील कर्मचाऱ्यांची संख्या १२-१३ एवढीच राहणार आहे. गाडीची देखभाल व दुरुस्ती करताना गाडीची चाके, ब्रेक, पंखे, दिवे यांची तपासणी करणे, गाडीच्या यांत्रिक भागात काही गडबड असल्यास दुरुस्त करणे ही सर्व कामे करावी लागतात.