क्रांती तरुण मंडळाचा कार्यकर्ता कार्तिक लक्ष्मीकांत जोशी या युवकाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मोठय़ा राममंदिरापासून मूकमोर्चा काढण्यात आला होता. यात सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन देऊन कार्तिक जोशी याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाईची मागणी केली.
कार्तिक जोशी याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याची मृत्युपूर्व जबानी का घेतली नाही. या सर्व प्रकरणात जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार भास्कर तंवर यांची भूमिका संशयास्पद असून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार गोवर्धन शर्मा, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय तापडीया, भाजप शहर अध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा, राजस्थानी ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र व्यास, मारवाडी युवा मंचचे निकेश गुप्ता, नगरसेविका राजेश्वरी शर्मा, अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.
या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दाद मागणार असल्याचे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अकोल्यास पोलिस उपायुक्त कार्यालय व्हावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.