शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याची क्षमता असणाऱ्या गोदा पार्क प्रकल्पास विरोधाची भूमिका घेण्यामागे गंगापूर धरणावर पर्यटन विभागामार्फत साकारल्या जाणाऱ्या मनोरंजन केंद्राचे कारण असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याची जवळपास तशीच व्यवस्था मनसे गोदापार्कवर करत असल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून गंगापूर धरणावर साकारल्या जाणाऱ्या पर्यटन केंद्रावर कोण जाईल याची चिंता राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व नगरसेवकांना सतावत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या प्रस्तावाला विरोध केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोदा पार्क प्रकल्प विनामूल्य देखभाल, दुरूस्ती व विकसीत करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनला देण्याचा निर्णय झाला, तेव्हा राष्ट्रवादी वगळता अन्य एकाही पक्षाने विरोध केला नाही. उलट शिवसेनेने नाशिकच्या विकासाला आमचा विरोध राहणार नसल्याची भूमिका घेतली तर काँग्रेसने हा प्रकल्प थेट नांदूपर्यंत नेण्याची सूचना केली. राज ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची धुरा रिलायन्स फाऊंडेशनने स्वीकारल्याने कित्येक वर्ष रखडलेले हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, नेमक्या त्याचवेळी गंगापूर धरणावर मनोरंजन केंद्राचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या दोन्ही ठिकाणी पर्यटक व नागरिकांना आकर्षित करण्यासाठी जवळपास एकसारखी मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे. गोदा पार्क प्रकल्प उपरोक्त संकल्पनेनुसार साकारला गेल्यास शहरापासून जवळपास १५ ते १८ किलोमीटर अंतरावरील गंगापूर धरणावर कोण जाईल, हा प्रश्न आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पुढाकारातून साकारल्या गेलेल्या गंगापूर धरणावरील मनोरंजन केंद्राचे महत्व गोदा पार्कमुळे कमी होईल, अशी भीती राष्ट्रवादीला वाटत आहे. याची परिणती गोदा पार्कच्या विरोधात झाली आहे.