शिरपूर बंधा-याची संकल्पना २० वर्षांपूर्वी मीच अमलात आणली. आता मुरूम विकण्यासाठी खोटे सांगून शिरपूर बंधा-याच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला. तर शिरपूर पॅटर्नचे बंधारे शेतकरीहितासाठी आहेत. प्रत्येक गावात हे काम केले जाईल, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे डोके ठिकाणावर नाही, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांनी केली. शिरपूर पॅटर्नच्या बंधा-यावरून ससाणे व मुरकुटे यांच्यात जुपली असून दोघे एकमेकांवर अर्वाच्य भाषेत आरोप करत आहेत.
२० वर्षांपूर्वी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशोक साखर कारखान्याच्या माध्यमातून अशोक बंधारे बांधले. आता ससाणे लोकसहभागातून ओढय़ा-नाल्यांवर शिरपूर बंधारे बांधत आहेत. भोकर येथे दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघांनी एकमेकावर जोरदार टीका केली.
या वेळी मुरकुटे म्हणाले की, शिरपूर पॅटर्न राबवायला निघालेले महाशय शेतक-यांना खोटी आश्वासने देऊन शेतक-यांची फसवणूक करून रॉयल्टी चुकवून शासनाचीही फसवणूक करीत आहेत.
ससाणे यांनी म्हटले की, जनतेच्या पिण्याचे पाणी, तालुक्यातील शेतीचे पाटपाणी, गोरगरीब जनतेचे प्रश्न याकडे सातत्याने लक्ष दिल्यामुळेच तीव्र दुष्काळातही जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. शिरपूर पॅटर्न मुरूम विकण्यासाठी नाही तर शेतकरी हितासाठीच आहे. आपली आमदारकी गेली म्हणून काहीही आरोप करायचे, परंतु डोळे उघडे ठेवा असा टोला माजी आमदार ससाणे यांनी माजी आमदार मुरकुटे यांना लगावला. दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी भोकर येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.