तिबेट सरकारचे निर्वासित पंतप्रधान (तिबेटी भाषेत कालोन ट्रिपा) डॉ. लोवसांग सांगे यांनी दिल्लीवरून नोरगालिंग तिबेटन सेटलमेंट, गोठणगावकडे जातांना भंडारा येथे भारत तिबेट मैत्री संघाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपला भारतातील जन्म, हॉवर्ड विद्यापीठातील अध्ययन, अध्यापन व डॉक्टरेट इत्यादी माहिती दिली. शुद्ध हिंदी भाषेत बोलण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद वाटत होता. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यापासून जगातील ४० देशात राहणाऱ्या तिबेटी लोकांना आपण भेटी देण्याचा  प्रयत्न करतो. एक दिवस तिबेट स्वतंत्र्य होईलच, हे सत्य त्यांच्यासमोर ठेवतो. आज तिबेटमध्ये दुसरी व तिसरी पिढी प्रब़ळ शत्रूला अहिंसेच्या मार्गाने तोंड देत आहे. हा लढा अधिक प्रखर  करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. भारतीय लेकशाहीचे मॉडेल तिबेटमध्ये आणण्याची आमची इच्छा आहे. पंतप्रधानांचा परिचय भारत तिबेट मैत्री संघाचे महासचिव अमृत बन्सोड यांनी करून दिला.