राज्य शासनाने प्रांताधिकारी कार्यालयाची पुनर्रचित यादी जाहीर केली असून शिरोळ व हातकणंगले तालुक्यांचे प्रांत कार्यालय इचलकरंजीतच राहणार आहे.
तसेच करवीर-गगनबावडा व राधानगरी-कागल या चार तालुक्यांची प्रांत कार्यालये करवीर (कोल्हापूर)येथे, तर पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यांचे पन्हाळा येथे, भुदरगड-आजरा तालुक्यांचे गारगोटी येथे व गडहिंग्लज-चंदगड तालुक्यांचे प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथे असणार आहे.     
राज्य शासनाने उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कार्यालये स्थलांतरित करण्याविषयी जून-जुलै२०१२ मध्ये हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यापैकी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय हातकणंगले येथे स्थलांतरित करणे प्रस्तावित होते. त्यावरून तेथे खळबळ उडाली होती.     
इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालय स्थलांतरित करू नये, अशा आशयाची हरकत आमदार सुरेश हाळवणकर यांनी महसूलमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे घेतली होती. या व्यतिरिक्त विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजीतील प्रांत कार्यालयाचे स्थलांतर थांबले असल्याचे आमदार हाळवणकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.