दोन महिन्याच्या कालावधीत चार वेळा आर्णीकरांना पुराचा फटका बसला असून पूरग्रस्तांचे जीवन पुन्हा अस्ताव्यस्त झाले असून १९९२ पासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने तात्काळ निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे यांनी आर्णी येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पूरग्रस्त व अतिक्रमणग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत असून हा आकडा २००० पर्यंत पोहोचला असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे शासनाचे व प्रशासनाचे, तसेच स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. पूरग्रस्तांना देणाऱ्या खावटी अनुदानावर व घर दुरुस्तीसाठी शासनाने आतापर्यंत १० कोटीवर २५ वर्षांत खर्च केले. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये, तर खरडल्या गेलेल्या शेतीसाठी २५ हजाराची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टर व खरडलेल्या शेतीला ६० हजार रुपए प्रती हेक्टर मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
ज्या शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत विम्याची रक्कम भरली आहे त्यात शासनाने पुढाकार घेऊन ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळावा म्हणजे शेतकऱ्यांना मोठा आधार होईल, असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचाही आरोप त्यांनी केला. २०१२ पासून खरडीचे पैसे शासनाने अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. त्यांची थकित रक्कम त्वरित देण्याची मागणी करून २०१२-२०१३ चे वीज बिल माफ करण्याचीही मागणी त्यांनी याप्रसंगी रेटली. खरीप पिके उद्ध्वस्त झाली असून आता रब्बी पिकासाठी शासनाचे हवालदिल शेतकऱ्यांना आíथक मदत द्यावी, असेही ते म्हणाले.
नदी-नाल्यांच्या पुरामुळे पूरग्रस्तांच्या मुलाच्ंो कपडे व शैक्षणिक साहित्य नष्ट झाल्याने त्वरित विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे पाठवलेल्या पत्रातून केल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या विभागाचे लोकप्रतिनिधी ज्येष्ठ मंत्री शिवाजीराव मोघे असून रामजी आडे त्यांचे कट्टर समर्थक समजले जातात. १९९२ पासून रामजी आडे यांनी हा प्रश्न मार्गी लावला. यासाठी सर्वपक्षीय मोर्चेही काढले होते. आंदोलन करून त्यावेळी आपल्याला यश मिळाले नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रामजी आडे यांनी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले आपण शासनावर टीका करत आहात त्यामुळे ही टीका मोघेंना लागू होत नाही का, तेव्हा त्यांनी नाही म्हणत प्रश्नाला बगल दिली. विशेष म्हणजे, त्यांचा रोष स्थानिक नेत्यांवर व प्रशासनावर दिसून आला. रामजी आडे मोघे यांचे समर्थक असल्याने पत्रकार परिषद कशासाठी बोलावली, याबाबत राजकीय क्षेत्रात मात्र चर्चेला पेव फुटले होते.