ऐरोली सेक्टर ५ येथील करण मित्र मंडळ व्यायामशाळेच्या नजीक असलेल्या दोन झाडांची अर्धवट छाटणी करण्यात आली आहे. या छाटणीसंदर्भात महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत आहे. पावसाळ्यात ही झाडे तुटून नजीकच्या घरांवर पडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. या झाडांनजीक असलेले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेत झाडांची छाटणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
व्यायामशाळेच्या नजीक जांभळाचे आणि बदामाचे अशी दोन झाडे आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्या झाडांची महानगरपालिकेने खोडाजवळ अर्धवट छाटणी केल्याने ही झाडे केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मागच्या वर्षी मान्सूनमध्ये जांभळाच्या झाडाच्या फांद्या नजीकच्या घरांवर पडल्याने घरांचे पत्रे तुटण्याची घटना घडली होती. यामुळे झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्यात, यांसदर्भात मागील वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करण्यात येत आहे. मात्र महानगरपालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिक सुजाता लाड यांनी केला आहे.  या झाडाची अर्धवट छाटणी करून तसेच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात ही झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास ही छाटणी महावितरणने केली असल्याचे महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात. महावितरणकडे चौकशी केल्यास छाटणी महानगरपालिकेने केली असल्याचे सांगण्यात येते. यांसदर्भात वारंवार पालिकेकडे पाठपुरावा सुरू असून अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष का देत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळ्यामध्ये झाडे कोसळल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.  

वाहन जात नसल्यामुळे अडचण
नवी मुंबई महानगरपालिका साहाय्यक उद्यान अधिकारी विलास पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणी वाहन जात नसल्यामुळे झाडे तोडण्यास अडचण निर्माण होत आहे. पण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून योग्य उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले.