मराठवाडय़ातील भीषण पाणी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून २७ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, ही जनता विकास परिषदेची मागणी फेटाळून लावतानाच त्यात राजकारणाचा भाग जास्त असल्याचा शोध राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे लावला. ‘जे मिळतंय त्यात समाधान माना’ असा सूर त्यांच्या बोलण्यात होता.
नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली व देगलूरच्या दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी बाळासाहेब थोरात मंगळवारी रात्री शहरात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत त्यांना येथे घेऊन आले. बुधवारी सकाळी बिलोलीला रवाना होण्यापूर्वी थोरात यांनी नगर जिल्ह्य़ातील परिस्थितीचा आढावा घेताना, जायकवाडीत पाणी सोडताना येणारे अडथळे रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश संबंधितांना दिलयाचे सांगितले.
पैठणजवळच्या जायकवाडी धरणात गेल्या महिन्यात सोडण्यात आलेले आणि आता सोडण्यात येत असलेल्या पाण्यावरून दोन विभागांमध्ये संघर्ष निर्माण झालेला असला, तरी नैसर्गिक संकट आहे, ते सर्वानी वाटून घेतले पाहिजे, अशी व्यापक भूमिका बाळासाहेबांनी मांडली.
ते म्हणाले की, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये पाऊस कमी पडला तसेच पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाने तळ गाठल्याचे समोर आल्यानंतर आम्ही काही जण एकत्र बसलो होतो. राधाकृष्ण विखे पाटील, मधुकरराव पिचडही होते. ‘जायकवाडीत पाणी सोडण्याचा अधिकृत निर्णय त्यावेळी झालेला नव्हता; पण औरंगाबाद शहर, जालना जिल्हा या भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी भूमिका आम्ही त्यावेळी स्वीकारली होती.’
नगर-नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून मराठवाडय़ाला २७ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने केली आहे. याकडे लक्ष वेधले असता थोरात यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यात राजकारणाचा भाग जास्त असल्याचे नमूद करून शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरही महसूल मंत्र्यांनी नापसंती व्यक्त  केली.
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून जायकवाडीला ९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाल्यावरही तुमच्या भागातून विरोध होत आहे. असे निदर्शनास आणून दिल्यावर ते स्वाभाविक आहे. पण आमची यंत्रणा सतर्क असून सर्व अडथळ्यांवर मात करून आवश्यक तितके पाणी जायकवाडीत आणले जाईल, अशी ग्वाही थोरात यांनी दिली.
माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी पाण्याच्या मुद्यावरून स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी करून खळबळ उडवून दिली; पण राजकीय पातळीवर त्या मागणीला अन्य कोणी प्रतिसाद दिला नाही. नगर-नाशिक जिल्ह्य़ांतून पाणी सोडले जात असताना, जायकवाडीच्या जलाशयात ९ टीएमसी पाणी आले पाहिजे याची दक्षता घेण्याची सूचना ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांनी केली.
काब्देंकडून नापसंती
दरम्यान, बाळसाहेब थोरात यांनी २७ टीएमसी पाणी देण्याची मागणी फेटाळताना त्यात राजकारणाचा भाग असल्याचे म्हटल्यानंतर मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी नापसंती व्यक्त केली. थोरात औरंगाबादचे पालकमंत्री असले तरी ते नगर जिल्ह्य़ाचे नेते आहेत, हे लक्षात घेता आपल्या भागात लोकप्रियता टिकविण्यासाठी ते तसे म्हणाले असतील. असे नमूद करून डॉ. काब्दे म्हणाले की, ही मागणी राजकारणातून नव्हे तर थोरात ज्या शासनाचे एक भाग आहेत, त्या शासनाने केलेल्या कायद्यानुसार मराठवाडय़ाला २७ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. थोरात यांच्यासारखे मंत्री त्यात आडवे येणार म्हणूनच आम्ही हा विषय न्यायालयात नेला असल्याचे काब्दे यांनी सांगितले.