चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश दुकळे यांच्या ‘यशवंतराव चव्हाण : माणूस आणि लेखक’ या ग्रंथास बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळाचा समीक्षा आणि संशोधनपर ग्रंथासाठी दिला जाणारा ‘वाङ्मय चर्चा साहित्य पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून बेळगाव येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. जी. के. ऐनापुरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ग्रंथास डॉ. अनिल गवळी यांची विवेचक प्रस्तावना लाभली असून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. डॉ. दुकळे यांना यापूर्वी शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी दिला जाणार ‘डॉ. व्ही. आर. करंदीकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल ग्रंथालीचे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष अमरसिंह नाईक, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.