अशोका मार्ग परिसरात उपमहापौरांना घेराव
आठवडय़ातील एक दिवस ‘नो वॉटर डे’ची संकल्पना शहरवासीयांना अडचणीची ठरली असून त्यामुळे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा तर काही भागात पाणीच येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याच कारणावरून बुधवारी अशोका मार्ग परिसरातील महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी रास्ता रोको करत उपमहापौरांसह स्थानिक नगरसेविकेला घेराव घालत जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला. पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तीन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संपूर्ण एक दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्यामुळे शहरातील अनेक भागात या स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून ‘नो वॉटर डे’ ऐवजी दररोज एकवेळ पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारल्यास पाण्याची अधिक बचत होईल, असेही मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळा लांबल्यास शहराला गंभीर टंचाईच्या स्थितीला सामोरे जावे लागू नये याकरिता महापालिकेने साधारणत: महिनाभरापूर्वी पाणी कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सध्या दररोज १० टक्के पाणी कपात आणि आठवडय़ातील एक दिवस म्हणजे मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाण्याची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम दिसू लागले आहेत. बुधवारी याच कारणावरून प्रभाग क्रमांक ३८ मधील अशोका मार्ग अर्थात पखाल रोड भागातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला.
या परिसरातील सिद्धीविनायक हौसिंग सोसायटी, गुरू-आशिष अशा अनेक इमारतींमध्ये सकाळी पुरेसा पाणी पुरवठा झाला नाही. आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी पाणी पुरवठा बंद असल्याने कोणाकडे वापरावयास पाणी शिल्लक नव्हते. त्यात, बुधवारी केवळ दहा ते पंधरा मिनिटे तेही कमी दाबाने पाणी मिळाले. घरात पिण्यासाठी पाणी शिल्लक न राहिल्याने सर्वच रस्त्यावर उतरले. शेकडो नागरिकांनी अशोका मार्गावर रास्ता रोको करत तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर उपमहापौर सतीश कुलकर्णी व स्थानिक नगरसेविका नीलिमा आमले यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली. संतप्त आंदोलकांनी त्यांना घेराव घालून पाणी पुरवळा सुरळीत होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला.
यावेळी पोलिसांनी धाव घेऊन मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची समजूत काढली. परंतु, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उपमहापौर व आमले यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. प्रत्येक मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यामुळे बुधवारी अतिशय कमी दाबाने अल्पकाळ पाणी पुरवठा होतो.
परिणामी, ज्या इमारतीत सदनिकांची संख्या अधिक आहे, तिथे पाणीच मिळत नसल्याची बाब आमले यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. एकूणच स्थिती लक्षात घेऊन, अधिकाऱ्यांनी या परिसरातील पाणी पुरवठा तीन दिवसात सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
या भागात दोन जलकुंभांची कामे प्रगतीपथावर असून त्यापैकी एकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्या कुंभावर विद्युतपंप कार्यान्वित झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. तात्पुरता उपाय म्हणून टँकरद्वारे काही इमारतींना पाणी देण्याचा तोडगा काढण्यात आला. या घडामोडीनंतर सुमारे दोन तासाहून अधिक काळ चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ‘नो वॉटर डे’ मुळे अनेक भागात ही समस्या भेडसावत आहे. यामुळे पाणी कपातीच्या वेळापत्रकाचा फेरविचार करून त्यात बदल करण्याची मागणी केली जात आहे.