सकाळी पहाटेच्या सुमारास रहिवासी साखरझोपेत असताना गच्चीतून आत येऊन घरातल्या वस्तू लंपास करण्यासारखे प्रकार वाढल्याने गोराईतील विशेषत: येथील म्हाडाच्या बैठय़ा चाळींमध्ये राहणारे रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.
येथे गेले कित्येक दिवस भुरटय़ा चोरांनी या परिसरात थैमान घातले आहे. पहाटेच्या सुमारास रहिवासी झोपत असताना हे चोर गच्चीतून किंवा गॅलरीतून घरात शिरतात आणि रहिवाशांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून त्यांच्या घरातून दागिने, पैसे, सेलफोन, टीव्ही, एलसीडी आदी मौल्यवान ऐवज लंपास करतात. गेल्या काही दिवसांत या पद्धतीने आरएससी ३६, दत्त मंदिर गल्लीतील प्लॉट नंबर २०३, २०५, २०६, २०९, २१०, २१२ या बैठय़ा चाळींमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने येथील रहिवाशांनी स्थानिक नगसेवकांच्या नेतृत्वाखाली सभा घेऊन पोलिसांना याचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
या सभेला नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्यासमवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण खैरे, सुनील माळी आदी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. चोरीच्या वाढत्या घटना आणि रहिवाशांची सुरक्षा या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. चोरीचे प्रकार वाढलेल्या बैठय़ा चाळी या म्हाडाच्या आहेत. दिवसा फेरीवाले, भंगारवाले, विक्रेते इत्यादी अनोळखी व्यक्ती चाळींमध्ये येत असतात. त्यापैकी काही भुरटे चोर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसा सोसायटीमध्ये पाहणी करून रात्री या घरांमध्ये चोरी करायची, अशी या भुरटय़ा चोरांची कामाची पद्धत असू शकते. त्यामुळे, अनोळखी व्यक्तींना चाळींमध्ये येण्यापासून मज्जाव करण्याचा विचार आता येथील रहिवासी करू लागले आहेत. तसेच सोसायटीची संरक्षक भिंत कमी उंचीची असल्यास ती वाढविणे, त्यावर काचा किंवा तारेचे कुंपण बसविणे, सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्यावर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना कळविणे, दागिने, पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू अडगळीच्या ठिकाणी ठेवणे अशा सूचना या सभेत करण्यात आल्या.
चिकूवाडी ते गोराई या परिसरामध्ये गस्ती घालत असताना कमीतकमी दोन पोलीस असावेत. तसेच, रात्रीच्या वेळी गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावे, काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, नाकाबंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांतर्फे पोलिसांकडे करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस कमी
या भागात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, सुरक्षेकरिता रहिवाशांनी केलेल्या मागण्यांवर किती अवलंब होईल, ही शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली. त्यामुळे, आपल्या संरक्षणासाठी रहिवाशांनीच पुढाकार घेऊन काही उपाययोजना केल्या पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. गोराई विभागातील प्रत्येक गल्लीतून कमीतकमी १५-२० तरुण मुलांना पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात यावे. या तरुणांची मदत पोलिसांना रात्री गस्तीच्या वेळेस होऊ शकेल. या मुलांना या कामासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे. जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.