हातात शस्त्र घेतलेल्या दोन गुंडांनी चंदननगरात बुधवारी सायंकाळी धुमाकूळ घालत दुकानदाराला खंडणी मागितली. इमामवाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकाश बाबुलाल जांगीड (रा. चंदननगर) हे काल सायंकळी त्यांच्या नरेश फर्निचर या दुकानामध्ये इतर कारागिरांसोबत काम करीत होते. आशिष रॉबर्ट व राहुल उर्फ बामण्या गणवीर (दोन्ही रा. चंदननगर) हे मोटारसायकलवर तेथे आले. त्यांच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्र होते. नगरसेवक गुड्डू तिवारी यांचे घर व कार्यालय तेथेच आहे. आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली. प्रकाश व त्याच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांनी दहा हजार रुपये मागितले. त्यानंतर रमा इलेक्ट्रिकल्स या दुकानाचा काचा फोडून रवी सेन या मुलास मारहाण केली. या घटनेने त्या परिसरात दहशत निर्माण झाली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दोनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते आरोपींचा शोध घेत आहेत.
नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
ओसीडब्लूच्या अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी एका नगरसेवकाविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयात ही घटना घडली. ऑरेंट सिटी वॉटर वर्क्सचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप कृष्णराव गुरवे ते महापालिकेचे सहायक आयुक्त मेश्राम यांच्या कार्यालयात सभेमध्ये बसले होते. तेथे नगरसेवक प्रवीण भिसीकर (रा. भिसीकर मोहल्ला, इतवारी) याने ‘तु माझ्या एरियात काम बंद कर’ असे म्हणत मारहाण केल्याची तक्रार गुरवे यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
मारहाण
भूखंडाची स्वच्छता करणाऱ्या सशस्त्र टोळक्याने मारहाण केल्याची घटना मानकापूरमधील संत ज्ञानेश्वर कॉलनीत दुपारी घडली. सूर्यप्रकाश शंभुनाथ पांडे (रा. एसबीआय कॉलनी अनंतनगर) व सिन्नु हनुमंत रेड्डी (रा. अनंतनगर) हे दोघे संत ज्ञानेश्वर कॉलनीमधील स्वच्छता करण्यासाठी गेले होते. जटाशंकर मिश्रा, जयशंकर मिश्रा, शिवकुमार मिश्रा (सर्व रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी) हे दहा साथिदारांसह तेथे आले. त्यांच्या हातात तलवार व लोखंडी रॉड होता. त्यांनी पांडे व रेड्डीला मारहाण केली. गाडीचे नुकसान केले. दोघा जखमींचा मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. जागेच्या वादावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांना समजले. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला बालिकेचा मृत्यू
इमारतीवरून खाली पडल्याने आठ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. महालमधील मुंजे सभागडहाजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. कशीश प्रदीप जयपूरकर (रा. नबाबपुरा) हे त्या बालिकेचे नाव आहे. जयपूरकर कुटुंब त्यांचे नातेवाईक राजेंद्र चरडे यांच्याकडे आले होते. प्रदीप जयपूरकर, त्यांची मुलगी कशीश इमारतीच्या गच्चीवर होते. अचानक आवाज झाल्याने लोकांनी पाहिले असता ते दोघेही जखमी अवस्थेत दिसले.
त्या दोघांना रहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कशीशला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2013 रोजी प्रकाशित
खंडणीसाठी दुकानदाराला धमकी देणारे गुंड फरार
हातात शस्त्र घेतलेल्या दोन गुंडांनी चंदननगरात बुधवारी सायंकाळी धुमाकूळ घालत दुकानदाराला खंडणी मागितली. इमामवाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकाश बाबुलाल जांगीड (रा. चंदननगर) हे काल सायंकळी त्यांच्या नरेश फर्निचर या दुकानामध्ये इतर कारागिरांसोबत काम करीत होते.
First published on: 12-04-2013 at 04:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rowdy absconding who threaten to shop keeper for indemnity