उंदीरगावातील काही गावगुंडांनी भोळसर असलेल्या आपल्या पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार वैशाली शिवाजी भालदंड (वय ३७) यांनी केली आहे. संपत्तीसाठी विष पाजून खून करण्याचा या लोकांचा प्रयत्न होता असे त्यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी अशी मागणी श्रीमती भालदंड यांनी केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझे पती शिवाजी पंढरीनाथ भालदंड (वय ५०) यांच्या नावावर असलेल्या जमिनीची विक्री करण्यात आली. घरही जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मी शिलेगाव (ता. राहुरी) येथे ऋषीकेश व कमलेश या दोन मुलांसह राहाते. जमीन विक्रीच्या व्यवहाराविरूद्ध मी न्यायालयात केलेल्या दाव्यात निकाल माझ्या बाजूने लागला आहे. त्यामुळे जमीन खरेदी-विक्री करणारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
माझ्या भावाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तुझा पती शिवाजी याने विष घेतले असून साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे कळविण्यात आले. मी दि. २० फेब्रुवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले असता पोलिसांनी हाकलून दिले. रूग्णालयात माझ्या पतीलाही भेटू दिले गेले नाही. मी २२ फेब्रुवारी रोजी माझ्या नातेवाईकांसह पती शिवाजी यांना भेटले असता त्यांनीच जबरदस्तीने मला विष पाजण्यात आल्याची कल्पना आपल्याला दिली असे श्रीमती भालदंड यांनी सांगितले. माझे पती शिवाजी भालदंड यांना विष पाजणाऱ्या गुन्हेगारांविरूद्ध पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी श्रीमती भालदंड यांनी केली आहे.