दिवाळीच्या सलग सुट्टय़ांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या बुलढाणा आगाराने प्रवाशांना अधिकाधिक प्रवासी सेवा पुरवून उत्कृष्ट वाहतूक व्यवस्थापन केले. परिणामत: बुलढाणा आगाराला ९३ लाख ७९ हजार ६९४ रुपयांचे विक्रमी उत्पन्न झाले. मागील वर्षांच्या तुलनेत ते १५ लाख ८८ हजार ५१ रूपये एवढे अधिक असल्याचे बुलढाण्याचे आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांनी सांगितले.
एस.टी.महामंडळाचे बुलढाणा विभाग नियंत्रक सी.आर. बोरसे, यंत्र अभियंता पी.एस. देवधर, विभागीय वाहतूक अधिकारी एस.टी. भुईरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विभाग व आगाराच्या वाहतूक चमूंनी दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये नियोजन करून ५ ते १६ नोव्हेंबर असे दहा दिवस ३७ हजार १७५ कि.मी. या फेऱ्या चालविल्याने ९३ लाख ८० हजाराचे उत्पन्न आले. हे उत्पन्न गतवर्षीपेक्षा प्रति कि.मी. ३.१७ ने जास्त असून भारमान २.५२ ने वाढले आहे. या उत्पन्न वाढी बरोबरच बुलढाणा आगाराने पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, धुळे, जळगाव आदी मार्गावर उपलब्ध प्रवाशांनुसार तातडीने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रवाशांची हेळसांड न होता प्रवाशांचा सुरक्षित, सुखकर व आरामदायी प्रवास झाला. बुलढाणा आगाराने नियोजनपूर्वक दहा दिवस राबविलेल्या या मोहिमेमध्ये स्थानकप्रमुख दीपक साळवे, एस.टी. बँकेचे संचालक अब्दुल जब्बार, बाबासाहेब जाधव, विजय पडघान, शे.लतीफ, प्रकाश ताठे, भास्कार वाघ, राजेंद्र पवार, कृष्णा पवार, विशाल राऊत, आर.पी. वाघ, गोपाल चव्हाण, बबन चव्हाण, विजय पवार, विलास येरमुले, निना पाटील, पी.पी. शिंदे, अरुण उबरहंडे, गोपाल राजपुत, अशोक चव्हाण, अंबादास खरे, जी.के. लहाने, संजय पाटील, सुरेश वखरे, समाधान जुमडे, भारत बचाटे, राम वनारे, माधव ठाकरे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.