परभणी शहरासह जिल्हाभरात छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. परभणी शहरात अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले.
शहरातील अश्वारुढ शिवपुतळ्यास अभिवादनासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाली होती. महापौर प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार, संबोधी अकादमीचे भीमराव हत्तीअंबीरे, भगवान वाघमारे, मराठा सेवा संघाचे प्रा. दिलीप मोरे, वारकरी मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते, संभाजी सेनेचे विठ्ठल तळेकर, विष्णू नवले आदींनी अभिवादन केले.
जिल्हा काँग्रेस कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, नगरसेवक शिवाजी भरोसे यांच्यासह गफार मास्टर, राजेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, इरफानुर खान, सूर्यकांत हाके आदी उपस्थित होते. पी. डी. जैन महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संदीप नरवाडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिंह यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन केले.
वारकरी मंडळाच्या सोहळ्यात दिवसभर कार्यक्रम झाले. सकाळी संगीत भजन, गवळण व भारुड हे कार्यक्रम पार पडले. मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. राधाकिशन होके यांना वारकरी भूषण, आर. डी. मगर यांना मराठा समाजभूषण, सोपानकाका बोबडे यांना वारकरी भजनरत्न, बालाजी काळे यांना मृदंग सेवा, माधवराव देशमुख यांना वारकरी भजनरत्न, गयाबाई लक्ष्मणराव खटींग यांना आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुपारी टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात शिवपुतळ्यापासून वसमत रस्त्याने खानापूर फाटय़ापर्यंत मिरवणूक निघाली. मिरवणुकीत भगव्या पताका, टाळ, मृंदग झांजपथक, गोंधळ, भारुड, अभंगवाणी आदींचा सहभाग होता. वारकरी शिक्षण संस्थेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब मोहिते यांनी महोत्सवाचे आयोजन केले.
 औरंगाबाद
शिवजयंती मराठवाडय़ात सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयघोष करीत दुचाकीवरून युवकांचे जत्थेच्या जत्थे बुधवारी दिवसभर शहरातील क्रांती चौकात येत होते. शहरातील प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.  दिवसभर अभिवादनासाठी रीघ लागलेली होती. मोठय़ा उत्साहात शिवजयंतीनिमित्त शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोठे व्याख्यानाचे कार्यक्रम होते, तर कोठे रक्तदान शिबिर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. राज्यकारभारात अनेक वेळा संकटे आली. पण महाराज कधीच जप-जाप, पूजा-अर्चा करीत बसले नाहीत. मावळ्यांच्या साथीने मोठय़ा हिमतीने त्यांनी स्वराज्य स्थापन केले. एकविसाव्या शतकात राशीभविष्य आणि भोंदू महाराजांच्या मागे हजारो सुशिक्षित लोक आहेत, हे देशाचे दुर्दैव. शिवरायांच्या चरित्रातून बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार शिकायला हवा, असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. विजय पांढरीपांडे होते. विविध महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात आली. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लातूर
शिवजन्मोत्सवानिमित्त शहरातील सर्वत्र शिवप्रतिमांचे पूजन करून मंगलमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंतीदिनी शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लागेल, अशी गाणी गायली जाऊ नयेत, बीभत्स नृत्य करू नये, या बाबत शिवप्रेमी संघटनांनी आठवडाभरापासून आवाहन केले होते. त्याचा योग्य परिणाम शिवजयंतीदिनी दिसून आला. मूकबधिर विद्यालय एमआयडीसी येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान झाले. बीएसएनएल कार्यालयात अॅड. वर्षांताई भिसे यांचे व्याख्यान झाले. शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर शिवभक्तांनी अभिवादन केले. रेणापूर येथे छत्रपती िहदवी सेनेतर्फे मेळावा झाला. असाच मेळावा औसा येथेही घेण्यात आला.
शहरातील राजीव गांधी चौकातून शिवप्रेमींनी भव्य दुचाकी रॅली काढली. शारदानगर, रेणापूर नाका, एमआयडीसी चौक, मोतीनगर, श्यामनगर, इंडियानगर, गूळमार्केट परिसर, कव्हानाका, विवेकानंद चौक, नंदी स्टॉप आदी ठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वर्षी प्रथमच संघटनेच्या नावापेक्षा उपक्रमावर शिवप्रेमींनी भर दिला.