वयाच्या सहाव्या वर्षी ऑर्थायटीसने ग्रस्त झालेल्या शेफालीला विपरीत परिस्थितीवर मात करण्याचे बळ तिची आई सुनीता जयस्वाल यांच्याकडून मिळाले. गेल्या वीस वर्षांपासून सुनीता या शेफालीसाठी फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड व आई, अशा विविध भूमिकेत काम करताना दिसतात. या दोघींच्या जीवनातील संघर्ष व त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीने त्याला दिलेले उत्तर हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
एका अपघातात ऑर्थायटीस या आजाराने शेफाली जयस्वाल ग्रस्त झाली. या आजारात अगदी लहानपणी तिच्या सांध्यांची वाढ खुंटली. इतरांच्या सांध्याप्रमाणे तिचे सांधे वळत वा वाकत नाहीत. शेफालीला गादीवर झोपविण्यापासून ते तिला उठविण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, तसेच रोजच्या वैयक्तिक सर्व गोष्टींसाठी तिला इतरांच्या मदतीची गरज असते. शेफालीच्या पायातील त्राण म्हणावा तसा सशक्त नसल्याने तिला स्वत:च्या पायावर चालता किंवा उभेही राहता येत नाही, पण ती स्वत:च्या पायावर मात्र उभी झाली (नोकरी करते) आहे. त्यामुळे तिला उचलून खुर्चीवर बसवावे लागते. अगदी लहानपणापासून या सर्व गोष्टी रोज न थकता, कुठलीही तक्रार न करता तिची आई सुनीता सतत करत आहे. मायलेकींच्या या संघर्षांत शेफालीच्या यशाचे रहस्य आहे. शेफालीचे वडील डॉ. चंदन जयस्वाल सरकारी नोकरीत असून अमरावतीला नेत्रतज्ज्ञ आहेत. त्यांची सतत बदली होत असल्याने सुनीता यांच्यावरच अधिक जबाबदारी आपसुक आली.
शेफालीच्या आजाराने तिला शाळेत नेणे, तिला वर्गात उचलून बसविण्याचे काम आईकडे आले. शेफालीला विपरीत परिस्थितीवर मात करण्यास मोठे बळ तिचे वर्ग मित्र व मैत्रिणींकडून अजूनही मिळत आहे. शेफालीने शालेय शिक्षणात कधीच ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविलेले नाहीत, हे विशेष. हे सारे करताना आई सुनीता यांनी वाचनाचाही छंद जोपासला. हा छंद ‘लोकसत्ता’ने अधिक वृद्धिंगत केल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. शेफाली शिकवणीसाठी गेल्यावर किंवा तिची परीक्षा सुरूअसताना मिळणाऱ्या मधल्या वेळेत त्यांनी हा वाचनानंद  मनसोक्त घेतलेला आहे. या ग्रंथांना त्यांना अनेक गोष्टी शिकविल्यामुळे शेफालीला मदत करताना त्रास झाला नाही व तिचा योग्य सांभाळ करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संगणकक्षेत्रात विज्ञान पदवीधरझाल्यावर एम.बी.ए. व एम.सी.ए.च्या प्रवेश परीक्षांमध्ये शेफालीला ९० टक्क्यांवर गुण होते. ही टक्केवारी पाहिल्यावर शेफालीची शिक्षणाविषयीची प्रबळ इच्छाशक्ती अधोरेखित होते. या काळात शेफालीला ‘इंडियन एक्स्प्रेस’ वाचण्याचा छंद लागला तो आजतागायत. गेल्या काही वर्षांत शेफालीने बँकेच्या स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याचा सपाटा लावला. युको व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँकांमध्ये लिपीक व ऑफिसर ग्रेडची परीक्षा ती उत्तीर्ण झाली, पण शारीरिक समस्या व क्षमता पाहता तिने ही नियुक्ती नम्रपणे नाकारली. बँक ऑफ महाराष्ट्रने अकोल्यात नियुक्ती देण्याचे आश्वासन दिल्याने सिव्हिल येथे ती सध्या कार्यरत आहे. कॅशिअरचे काम वगळता सर्व कामात ती आता पारंगत झाली. या कामात तिला बँकेतील वरिष्ठांची व इतरांची मोठी मदत मिळते.
जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड देताना लढा देण्याची महत्त्वपूर्ण शिकवण सुनीता व शेफाली यांच्या जीवनसंघर्षांतून मिळते. आजही शेफाली नोकरी असताना तिची सर्व कामे आई सुनीता अविरतपणे करत आहेत. शेफाली घरात व्हीलचेअर वापरते, पण ऑफिसमध्ये तिला एकाच ठिकाणी पाच ते सात तास बसून काम करावे लागते. ही मोठी अडचण असताना ती इतरांप्रमाणे कार्यरत आहे. जागतिक महिला दिनी मायलेकींच्या या संघर्षांला आमचाही सलाम!