काम पुढे रेटण्यास ठेकेदाराचा नकार
शहर पाणीपुरवठय़ाची व्यवस्था ‘समांतर’च्या ठेकेदाराच्या स्वाधीन करण्याची महापालिकेला झालेली घाई आता अडचणीची ठरू लागली आहे. महापालिकेसाठी निधीचा गुंता व ठेकेदाराने बँक गॅरंटी न दिल्यामुळे ‘समांतर’चा गाडा पुन्हा रुतला आहे. ठेकेदाराने बँक गॅरंटीपोटी ७९ कोटी भरणे अपेक्षित होते. ही रक्कम ठेकेदाराला उभी करता आली नाही. परिणामी, समांतर पाणीपुरवठय़ाची व्यवस्था ठेकेदाराला देण्याबाबतचे आदेश प्रशासनानेही दिले नाहीत.
दरम्यान, ठेकेदाराने पाणीपुरवठय़ाच्या देखभालीसाठी नियुक्त केलेल्या दीडशे कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी समांतरचा गुंता वाढल्याचे मान्य केले. ‘समांतर’बाबत लेखी आदेश मिळेपर्यंत काम सुरू करणार नाही, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली आहे, तर बँक गॅरंटीची कागदपत्रे प्रशासनाला मिळत नाहीत तोपर्यंत लेखी आदेश देणे अडचणीचे ठरणार असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा पेच कायम राहणार आहे. केंद्र सरकारच्या ‘यूडीआयएसएसएमटी’ योजनेतून समांतर पाणीपुरवठय़ासाठी सुमारे ७ अब्ज ९२ कोटींची योजना मंजूर झाल्यानंतर महापालिकेला त्यासाठी ९४ कोटी उभे करावे लागणार होते. तसे आर्थिक व्यवहार महापालिकेला जुळवून आणता आले नाहीत.  महापालिकेच्या स्तरावर जसा गुंता आहे, तशीच समस्या ठेकेदारासमोरही आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ठेकेदाराचे कर्जप्रकरण अजूनही पूर्णत: मार्गी लागली नसल्याची माहिती आहे. ठेकेदाराकडून बँक गॅरंटीची रक्कम न मिळाल्याने हस्तांतरणाचा तिढा कायम आहे. दरम्यान, तोंडी आदेशाने समांतरचे काम सुरू करावेत, असे आदेश ठेकेदाराने धुडकावून लावले आहेत. कर्मचाऱ्यांनाही रजा दिल्याने ठेकेदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. घाईघाईने हस्तांतरणाचा हा निर्णय का घेतला गेला, असा सवालही केला जात आहे.