वाळू घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टीची विचारणा करत असताना जावेद सरफोद्दीन शेख याने मंडळ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा औराद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे.
औराद येथील तेरणा नदीच्या पुलावरून मंगळवारी सकाळी १० वाजता वाळू घेऊन निघालेला ट्रॅक्टर (एम.एच. २४ डी १६२१) मंडळ अधिकारी एस. बी. दिवाण यांनी अडविला.
चालकाकडे वाळूच्या रॉयल्टी पावतीची चौकशी केली. जावेद शेख याने मंडळ अधिकाऱ्यास अरेरावीची भाषा केली. कोण काय करतो ते बघून घेतो, असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणला.  या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. या प्रकरणी जावेद शेख याच्याविरुद्ध मंडळ अधिकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणला व उद्धट वर्तन केल्याप्रकरणी ३५३ नुसार गुन्हा दाखल केला. औराद पोलिसांनी शेख यास अटक केली आहे.