सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे पूर्णा नदीपात्रात ७ लाख ५९ हजार रुपये किमतीच्या वाळूची तस्करी करणाऱ्या ५ आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एम. टी. जोशी यांनी फेटाळला.
गेल्या १० ऑक्टोबरला सिसारखेडा येथे वाळू चोरून विक्रीसाठी नेली जात असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली विक्रमसिंग प्रेमसिंग राऊत या मजुराचा मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रार दिली. तहसीलदार, मंडल अधिकारी व उपळी सज्जाचे तलाठी यांनी सिसारखेडा येथील वाळूपट्टय़ाला भेट देऊन पाहणी केली असता २ लाख ४४ हजार ३०० ब्रास वाळूचा अवैध उपसा झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी ३० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काही आरोपींना अटक झाली, तर काही फरारी झाले. आरोपी प्रभू छोटीराम सुरे, रमेश देवराम राऊत, सांडू छगन सुरे, जगन गोविंदा राऊत व पळशी येथील रामेश्वर गमाजी बडख यांना अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेला अपील अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयातही आरोपींचे अर्ज सोमवारी फेटाळण्यात आले.