महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम हे सातारा जिल्ह्याने केले आहे व येणाऱ्या निवडणुकीतही राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम सातारा जिल्हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करून इतिहास घडवेल, असा विश्वास जलसंपदामंत्री तथा  पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कोर्टी (ता. कराड) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, कार्याध्यक्ष सुनिल माने, आमदार बाळासाहेब पाटील, कराड बाजार समितीचे सभापती दाजी पवार, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निलमताई पाटील-पार्लेकर, यांची उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, की सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असून, त्यात काही नवीन पक्षाचा उदय झाला आहे. तर, आम्हीच सत्तेवर येणार असल्याचे भाकित करण्याचा प्रयत्न काही पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, जनता काँग्रेस आघाडी सरकारलाच स्वीकारेल असा दावा त्यांनी केला.
डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, की या तालुक्यात नसणारी व ज्यांना फार कोणी विचारत नाही अशी काही मंडळी या भागात निधी आणला, माझ्यामुळे कामे झाली असे खोटेनाटे सांगून कॉलर ताट करायला लागलेत. यावर आम्ही गप्प बसणार नाही. स्वत:ची प्रतिमा स्वच्छ आहे म्हणून आजूबाजूला चाळीस चोर जमवून बसला असाल तर असे अलिबाबा काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास व अजित पवार यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब पाटील, देवराज पाटील यांची भाषणे झाली.