सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाचा प्रारंभ येत्या शनिवारी (दि. २) सायंकाळी साडेचार वाजता लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष सी. व्ही. दोशी यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.   
दोशी म्हणाले, की महोत्सवात कविसंमेलन, कथाकथन तसेच नामवंत साहित्यिकांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमांचे आयोजन सातारच्या स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शुभारंभानंतर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोद कोपर्डे असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रदीप निफाडकर राहणार आहेत.
नगरवाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन २ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवानिमित्त २ व ३ फेब्रुवारीस स्वयंवर मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ३) सकाळी साडेनऊपासून कथाकथन होईल. यामध्ये रवींद्र कोकरे, हिम्मत पाटील, अमित शेलार यांचा सहभाग आहे. साडेअकरा वाजता ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांची प्रकट मुलाखत होईल. दुपारी ४ वाजता अभय देवरे आणि पूजा सबनीस यांचे कथाकथन होईल. या शतकोत्तर हीरक महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. वीणा देव यांच्या हस्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सी. व्ही. दोशी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस युवराज पवार, दिनकर शालगर, प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, ज्योत्स्ना कोल्हटकर आदी उपस्थित होते.