लांडगे आणि बकऱ्यांप्रमाणे जगणाऱ्या नागरिकांना आणि पर्यायाने देशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. शरद ठाकर यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सावरकर यांनी उर्दूत लिहिलेल्या गझल आणि सावरकरांच्या मराठी कवितांचा हिंदूी अनुवाद असलेल्या ‘हम ही हमारे वाली है’ या ध्वनिफितीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव या वेळी उपस्थित होते.
सावरकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांनी केलेली क्रांती आणि कविता या दोन्ही जुळ्या बहिणी असून त्या आधारेच सावरकर अंदमानाच्या कोठडीत जिवंत राहिले आणि तेथूनच संपूर्ण देशभर क्रांतीचा वणवा पेटला, असेही डॉ. ठाकर म्हणाले. साधू यांनी सांगितले की, सावरकर यांच्या प्रत्येक कवितेत स्वातंत्र्याची ऊर्मी आणि देशासाठी काम करण्याची इच्छा दिसून येते. अंदमानच्या कारागृहात स्वातंत्र्याची आकांक्षा आणि कविता हेच सावरकर यांचे कवच होते. तर सचदेव म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळात सावरकरांनी लिहिलेल्या कविता या स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा, याबाबत विवेचन करणाऱ्या होत्या. रत्नागिरीच्या पतीतपावन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यनिवारणाचे मोठे काम केले. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ध्वनिफितीमधील कवितांना भरत बलवल्ली यांचे संगीत असून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवेदन आहे. या वेळी स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचीही भाषणे झाली. मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविक केले.
सुरेश वाडकर, जसविंदर नरुला, वैशाली सामंत, भरत बलवल्ली, साधना सरगम आदींनी या ध्वनिफितीमधील काही कविता तर पूर्वी भावे आणि गुरुराज कोरगावकर यांनी नृत्य सादर केली.