क्रांतिकारकाचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे जाज्वल्य साहित्य आणि विचार जागतिक पातळीवर अगदी अंधांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या काही निवडक ग्रंथांचे ‘ब्रेल’लिपीत रूपांतर करण्यात आले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या विनंतीवरून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात ‘नॅब’ या संस्थेने हे महत्त्वपूर्ण काम केले आहे.  
सावरकरसाहित्य मराठी, हिंदूी व इंग्रजीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे साहित्य जागतिक पातळीवर आणि मुख्यत: अंधांपर्यंतही पोहाचावे, या उद्देशाने काही निवडक पुस्तकांचे ‘ब्रेल’ लिपीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यात
‘सहा सोनेरी पाने’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुपदपादशाही’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आदीं पुस्तकांचा समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत सावरकरांच्या एकूण १० पुस्तकांचे ‘ब्रेल’लिपीत रूपांतर करण्यात आले असून या सर्व पुस्तकांची पृष्ठसंख्या सुमारे पाच हजार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मंगळवारी सावरकर स्मारक आणि ‘नॅब’चे मुख्य पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. सध्या तरी ‘ब्रेल’लिपीतील या पुस्तकांच्या मर्यादित प्रती उपलब्ध आहेत.
मात्र लवकरच त्याच्या अधिक प्रती तयार करून ही पुस्तके भारतात आणि परदेशात अंध व्यक्ती आणि संस्थांपर्यंत विनामूल्य पोहोचविण्याचा सावरकर स्मारकाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.