गाव पातळीवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटय़ांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या नाबार्ड आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि विकास संस्थाच्या कर्मचारी संघटनेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नाबार्ड व रिझव्‍‌र्ह बँकेने हे आदेश त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
प्रा. राजू देसले, विष्णूपंत गायखे, भगीरथ शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी, किसान सभा, नाशिक जिल्हा विविध कार्यकारी सोसायटी जिल्हा संघटना, गट सचिव संघटना, आयटक आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. गाव पातळीवर विविध कार्यकारी सहकारी संस्थांची संख्या एक लाखपर्यंत आहे. या संस्थांमार्फत गावात शेतकऱ्यांना कमी वेळेत सर्व प्रकारे कर्ज पुरवठा केला जातो. शेती उपयुक्त अवजारे, खते, बी-बियाणे, औषधे शेतकऱ्यांकरिता प्रयोगशाळा व इतर उपक्रम राबविले जातात. परंतु २२ जुलैच्या नाबार्ड व रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशान्वये विविध कार्यकारी संस्थांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. निव्वल दलाली करणाऱ्या संस्था म्हणूनच त्यांचे अस्तित्व शिल्लक राहील. यामुळे महाराष्ट्रातील २१३०० व नाशिक जिल्ह्य़ातील ११०० तसेच १६५ आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या अस्तित्वावर गंडांतर येऊन शेतकरी व शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांवर गंभीर परिणाम होणार आहे, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. या आदेशामुळे विविध कार्यकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमधील सभासद शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जासह इतर सुविधा वेळेवर उपलब्ध होणार नाहीत. पर्यायाने शेतकरी दलाल, सावकारांच्या कचाटय़ात सापडेल अशी भीतीही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बचाव समितीने व्यक्त केली. राज्यातील विकास संस्थांमध्ये कार्यरत सचिव व सचिवेतर कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख आहे. त्यांच्या नोकरीवर गदा येईल. नाबार्डने विविध कार्यकारी संस्थांना थेट कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, संस्थांचे सचिव, सचिवेतर कर्मचारी यांचे वेतन व व्यवस्थापन खर्चाकरिता शासनाने अनुदान द्यावे, आदिवासी विकास संस्थांना आदिवासी विभागातील सर्व योजनांच्या अंमलबजावणीची कामे द्यावीत, संस्था मजबूत करण्याकरिता गाव पातळीवरील शासकीय कामे संस्थांना द्यावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.