ऐन सणासुदीच्या दिवसांत मराठवाडय़ातील स्वस्त धान्य दुकानांतून साखर उपलब्ध होणार का, हा प्रश्न जटील बनण्याची शक्यता आहे. पुरवठा विभागाकडून या महिन्यासाठी दिलेले साखरेचे नियतन लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या नावे काढण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी आमच्याकडे साखरच उपलब्ध नाही, असे बुधवारी सांगितले. या पूर्वीही जून-जुलैमध्ये याच कारखान्याच्या नावे नियतन मंजूर केले होते. तेव्हाही रास्त भाव दुकानात साखर पोहोचली नव्हती.
सणासुदीच्या दिवसांत प्रतिव्यक्ती साखरेचा कोटा वाढवून दिला जातो. नॉमिनीने कारखान्याकडून साखर उचलून त्याची वाहतूक रास्त भाव दुकानापर्यंत करावयाची असते. केंद्र सरकारमार्फत कोणत्या कारखान्याकडून साखर कोणत्या जिल्ह्य़ासाठी या बाबतचे आदेश दिले जातात. या वेळी लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कारखान्याकडून आठही जिल्ह्य़ांत साखर पुरवठा केला जावा, असे कळविण्यात आले. चालू महिन्यातही काही सहकारी साखर कारखान्यांनी रास्त भाव दुकानांना साखर उपलब्ध करून देण्यास नकार दिला. या पाश्र्वभूमीवर या महिन्यातील साखर उपलब्धतेबाबत लोकमंगल अ‍ॅग्रोकडे विचारणा केली असता, साखर उपलब्ध नसल्याचे सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेल्या सुभाष देशमुख यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील साखरेचे नियतन
औरंगाबाद – ७ हजार ६८९, जालना – ४ हजार ८८१, परभणी – २ हजार ६७२, हिंगोली – १ हजार ८९५, बीड – ८ हजार ३४, नांदेड – ६ हजार १४४, उस्मानाबाद – ३ हजार ६१८, लातूर – ४ हजार १८९ क्विंटल.