मूळचा ठाणेकर, पण नोकरीनिमित्त अमेरिकेत असणाऱ्या सौरभ पालकरचे ऐन तारुण्यात कॅन्सरने गेल्या वर्षी १० मे रोजी निधन झाले. त्याच्या स्मृतीनिमित्त त्याच्या जन्मदिनी- २३ जून रोजी त्याच्यासोबत डेलावेअर विद्यापीठात असणाऱ्या सहृदांनी एकत्र जमून त्याला श्रद्धांजली वाहिली. तसेच सर्वानी मिळून २५ हजार डॉलर जमवून ती रक्कम डेलावेअर विद्यापीठाकडे सुपूर्द केली. त्यातून दरवर्षी चार टक्के व्याजदराने मिळणाऱ्या एक हजार डॉलरची शिष्यवृत्ती सौरभच्या नावे विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रूपाने ठाणेकर सौरभच्या स्मृती आता अमेरिकेत कायम दरवळत राहणार आहेत.
यू.डी.सी.टी.मधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सौरभने १९८९ मध्ये डेलावेअर विद्यापीठात पीएच.डीसाठी प्रवेश घेतला. तिथे त्याला पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याच्यासोबत त्याचा बालपणापासूनचा मित्र राजेश खरेही डेलावेअरमध्ये पीएच.डीसाठी गेला. १९९३-९४ मध्ये दोघेही पीएच.डी झाले. त्यानंतर सौरभ गेली आठ दहा वर्षे फिलाल्डेफिया येथील मर्क अ‍ॅण्ड कंपनीत संशोधन विभागात कार्यरत होता. तेथील महाराष्ट्र मंडळात सातत्याने कार्यरत असणाऱ्या सौरभने तिथे भरलेल्या जागतिक मराठी संमेलनातही उत्साहाने भाग घेतला होता. २०१० च्या डिसेंबरमध्ये त्याला कॅन्सर झाल्याचे कळले. कोलोनचा कॅन्सर तसा पूर्ण बरा होऊ शकतो. त्यात तो अमेरिकेत असल्याने तिथे उपलब्ध सर्व आधुनिक औषधोपचारांनी तो नक्की बरा होईल, अशी आशा त्याचे कुटुंबीय बाळगून होते. मात्र दैवगतीच्या मनात काही वेगळेच होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात  आई-वडील त्याला अमेरिकेत भेटून ठाण्यात परतले आणि त्यानंतर १५ दिवसांनीच त्याचे निधन झाले.
सौरभविषयी त्याच्या अमेरिकन मित्रांना असलेली आपुलकी केवळ शिष्यवृत्तीपुरती मर्यादित राहिली नाही. डेलावेअर विद्यापीठात पीएच.डीसाठी सौरभचे गाईड असणारे डॉ. ए.एम. लेनहॉफ नुकतेच काही कामानिमित्त मुंबईत आले होते. राजेश खरेंकडून सौरभच्या ठाण्यातील घरचा पत्ता घेऊन ते त्याची आई मीना तसेच वडील अरविंद पालकरांना भेटले. गप्पांमध्ये सौरभच्या आठवणींचा अल्बम पुन्हा चाळला गेला. पालकर कुटुंबीयांचे सांत्वन करून निघताना त्याने डेलावेअर विद्यापीठाचे एक छोटे घडय़ाळ त्यांना भेट म्हणून दिले. तसेच अमेरिकेत गेल्यावर सौरभचा मोठा भाऊ कौस्तुभला ई-मेल करून आपल्या भावना व्यक्त केल्या..