येथील नवसारीजवळील चौकात गेल्या २७ नोव्हेंबरला स्कूलव्हॅन अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या हर्ष सचिन इंगोले (५) या विद्यार्थ्यांचा नागपुरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अपघातातील बळींची संख्या ६ झाली आहे.
हर्ष इंगोले याच्यावर नागपूर येथील केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.
न्यूरोसर्जन्सनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारांना त्याने प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरा त्याचे पार्थिव शरीर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
मंगळवारी त्याच्या पार्थिवावर कुंड खूर्द येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सारे गाव त्याच्या मृत्यूने हेलावून गेले होते.
गेल्या २७ नोव्हेंबरला नवसारीजवळील वळण रस्त्यावरील चौकात एसटी मिनीबस आणि स्कूलव्हॅनमध्ये टक्कर झाल्याने पाच शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली होती. अरुणोदय आणि पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने समाजमन हेलावून गेले होते.