यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सलग दुसरी बैठक निर्णयाविना आटोपती घ्यावी लागली. शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी मुश्रीफ यांनी सहायक कामगार आयुक्त आर.आर.हेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमागधारक व कामगार यांचे प्रत्येकी चार प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची घोषणा केली. समितीत सहभागी होण्यावरून कामगार संघटनात दुफळी झाल्याचे चित्र समोर आले.    
यंत्रमाग कामगारांना ८ तासांच्या पाळीला ४०० रूपये पगार वा दरमहा १० हजार रूपये वेतन मिळावे, यासाठी इचलकरंजीतील ११ कामगार संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगार संघटना संयुक्त कृतिसमितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. याप्रश्नी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये निर्णय न झाल्याने आज पुन्हा बैठक आयोजित केली होती.    
कामगार मंत्री मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा पुढे जात नव्हती. तीन वर्षांतील महागाई निर्देशांक लक्षात घेऊन मजुरीवाढ करणे, प्रत्येक सहा महिन्यानंतर पिसरेट मजुरीत वाढ करणे, निश्चित वेतनाचा मुद्दा बाजूला ठेवणे, असे हाळवणकर यांनी ठेवलेले प्रस्ताव कामगार प्रतिनिधींनी फेटाळून लावले. निश्चित पगारावर कामगार प्रतिनिधी ठाम राहिल्याने त्यास यंत्रमागधारक प्रतिनिधींनी आक्षेप घेतला.    
अखेर मुश्रीफ यांनी यंत्रमागधारक व कामगार यांचे प्रत्येकी चार सदस्य असलेली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. समितीत सहभागी होण्यास कृतिसमितीच्या सदस्यांनी नकार दिला. मात्र बाबा नलगे, किरण माळी, आनंदा गुरव यांनी होकार दिल्याने कामगार संघटनांत दुही निर्माण झाली.     
२१ जानेवारीपासून कामगारांनी बेमुदत आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलन थांबविण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले. मात्र, कामबंद आंदोलन होणारच असा निर्धार कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केला. या चर्चेत माजी खासदार निवेदिता माने, धनपाल तारे, सतीश कोष्टी, विनय महाजन, दीपक राशीनकर, राजगोंड पाटील, तर कामगारांच्यावतीने दत्ता माने, श्यामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, सचिनखोंद्रे व सहायक कामगार आयुक्त बी.डी.गुजर यांनी भाग घेतला.