राज्यातील दुसऱ्या अशा वृत्तपत्र विक्रेता भवनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सोयीसुविधांचे भरभरून आश्वासन दिले.
वर्धा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघटनेने सदस्यांच्या सहकार्यातून म्हाडा कॉलनी परिसरातील व्यापारी संकुलात वृत्तपत्र विक्रेता भवनाची स्थापना केली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे मुंबईनंतर हे राज्यातील दुसरेच असे स्वतंत्र कार्यालय ठरले आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलतांना राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले की, बसस्थानक परिसरात वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वतंत्र जागा देण्याबाबत आपण पुढाकार घेऊ. राज्य शासनातर्फे  असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येत असून त्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचाही समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संघटनेतर्फे  भविष्यात उभारण्यात येणाऱ्या सभागृहासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची हमी खासदार रामदास तडस यांनी दिली. आमदार डॉ.पंकज भोयर यांनी विक्रेत्यांच्या मागणीनुसार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माजी खासदार दत्ता मेघे यांनी सावंगीच्या रुग्णालयात वृत्तपत्र विक्रे त्यांना नाममात्र दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. याप्रसंगी पती निधनानंतरही वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय सांभाळणाऱ्या वृषाली कडू यांचा गौरव करण्यात आला. तसेच वयाच्या नव्वदीतही हे काम करणारे सदाशिवराव अटाळकर, ज्येष्ठ वितरक जानराव राऊत, केशव हंबर्डे, पुंडलिक चौधरी, मारोतराव चोपडे, अजाबराव भोकरे, विशाखा नारायणे यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील पाटणकर म्हणाले की, संघटनेची स्वतंत्र वास्तू असण्याचे शेकडो वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वीस लाख रुपये खर्च करून स्थापन करण्यात आलेल्या या कार्यालयात वितरणाबाबतचा सर्व अहवाल ठेवला जाईल. विक्रेत्यांच्या अडचणी सोडविणे, दैनंदिन समस्या दूर करणे, विक्रेत्यांच्या विकासाबाबत योजना तयार करणे, अशी व अन्य कामे नियमित पार पाडली जातील. राज्यात हे असे दुसरेच कार्यालय असून विदर्भातील इतरही वृत्तपत्र विक्रेता संस्थांनी याचा आदर्श ठेवून वाटचाल सुरू केली आहे. सर्वात दुर्बल पण प्रतिष्ठित असा व्यवसाय आम्ही समाजसेवेच्या भावनेतून करतो, असेही पाटणकर म्हणाले.  कार्यक्रमास परभणी, नांदेडसह विदर्भभरातून वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second newspaper seller buildings started
First published on: 03-02-2015 at 07:22 IST