शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या जाचाला कंटाळून रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी तडकाफडकी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र ‘मातोश्री’वरून धावत आलेल्या नेते मंडळींनी मन वळविल्याने त्यांनी आपला राजीनामा गुरुवारी मागे घेतला. मात्र आपल्याला पदोपदी अपमानित करणाऱ्या विनोद घोसाळकर यांच्याविरुद्धचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या घरावर महिला शिवसैनिक मोर्चा काढणार, असा फोन आल्याने रक्तदाब वाढून मी कोसळले. कार्यकर्त्यांनी मला रुग्णालयात दाखल केले. हे कळताच रश्मी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ रुग्णालयात येऊन माझी विचारपूस केली. मात्र विभागातील शिवसैनिकांना मला भेटू नये असे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण विकोपाला गेल्यानंतरही घोसाळकर यांची दहशत कमी झालेली नाही. उलटपक्षी रुग्णालयात मला भेटायला कोण येते हे पाहण्यासाठी घोसाळकरांचे समर्थक या परिसरावर नजर ठेवून आहेत, अशी खंत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. घोसाळकर पिता-पित्राकडून होणारा मानसिक त्रास आणि ढासळलेली प्रकृती यामुळे घरच्यांनीच आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. परंतु मतदारांचा विश्वासघात करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण राजीनामा मागे घेत आहोत. मात्र जोपर्यंत विनोद घोसाळकर यांना विभागप्रमुखपदावरून पायउतार करीत नाही तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध आपला लढा असाच पुढे सुरू सुरू राहील, असे त्या म्हणाल्या.
प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणतेही भाषण सुरू करण्यापूर्वी माता-भगिनींपुढे नतमस्तक होत. त्याच शिवसेनेतील विभागप्रमुखाने आपल्याच नगरसेविकांचे खच्चीकरण चालविले आहे. विशेष म्हणजे विभागप्रमुखाने काहीही मनमानी केली तरी ‘मातोश्री’ने या प्रकाराची अजिबात दखल घेतली नाही. या ‘असुरक्षित नगरसेविकां’ना भेटण्याचे आश्वासन देऊनही ‘मातोश्री’ने ते पाळले नाही. नेतृत्वाच्या या उदासीन प्रतिसादामुळे महिलांना छळणाऱ्या नेत्याचे मनोधैर्य आणखीनच वाढले आणि जणू आपण काही केलेलेच नाही, अशा आविर्भावात तो आणखीनच दांडगेशाही करू लागला. आपल्याच पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक देण्याच्या या प्रकारामुळे राज्यभर संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या नगरसेविकांची भेट घेऊन घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे या नगरसेविका शिवसेना-भाजपच्या असल्या तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय महिला एकवटल्या आणि त्यांनी या प्रकाराची तड लावण्यासाठी दहिसर पोलीस ठाण्यावर गुरुवारी मोर्चा नेऊन आपल्या बुलंद आवाजाने परिसर दणाणून सोडला. अन्यायाच्या विरोधात महिला नगरसेविका ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. आता प्रश्न आहे तो पक्ष म्हणून शिवसेना आता काय भूमिका घेते हा. या नगरसेविकांना अभय देऊन, त्यांना धीर देऊन मस्तवाल नेत्याचे कान पिळणार की नगरसेविकांना असेच वाऱ्यावर सोडणार? याकडे समस्त महिला नजर ठेवून आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
नगरसेविकांबाबत झाल्या प्रकाराची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. घोसाळकर पिता-पुत्रांवरील आरोपांची १० दिवसांमध्ये सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना केली आहे.
विनोद घोसाळकर आणि त्यांचा पुत्र अभिषेक यांच्याविरुद्ध नगरसेविकांनी अनेक आरोप केले आहेत. बिल्डरचे हितसंबंध जपण्यासाठी या दोघांनी खालची पातळी गाठली असून नगरसेविकांचा प्रचंड मानसिक छळ केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची १० दिवसांत चौकशी करून अहवाल द्यावा, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी केली आहे.
सामाजिक कार्यायी आवड असल्यामुळे महिला राजकारणात येतात. त्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. त्यासाठी वातावरण चांगले असणे आवश्यक आहे. अन्यथा राजकारणात येताना महिलांना शंभरवेळा विचार करावा लागेल. मात्र हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिला. राजकारण ही आपली मक्तेदारी असल्याचा काही पुरुषांचा समज आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये महिलांची घुसमट होत असून पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी दखल घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
समर्थनार्थ महिला उतरल्या रस्त्यावर!
शिवसेनेतील वरिष्ठ महिला नेत्यांनी तसेच नेतृत्वानेही मिठाची गुळणी धरली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नगरसेविका आणि सामाजिक संस्थांतील समाजसेविका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. नगरसेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिलांनी गुरुवारी दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन विनोद घोसाळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
शीतल म्हात्रे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी समाजसेविका मीरा कामत आणि आर. एम. दादरकर यांनी महिलांना आवाहन केले होते. या मोर्चामध्ये शिवसेना-भाजप वगळता अन्य पक्षांच्या नगरसेविका आणि समाजसेविका मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीचे काय झाले, असा सवाल या महिलांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांना विचारला. या तक्रारीचे एफआयआरमध्ये रूपांतर करून त्वरित तपास पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पिरजादे यांनी दिले.
गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढत असून महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’च्या धर्तीवर महिलांसाठीही विशेष कायदा करावा, अशी मागणी मीरा कामत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच आपले काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विनोद घोसाळकर आणि त्यांच्या पुत्रावर असेल
शीतल म्हात्रे
* मतदारांच्या विश्वासावर महिला निवडून येतात आणि आपल्या मतदारसंघांमध्ये पारदर्शकपणे कामेही करीत आहेत. अशा वेळी नेत्यांकडून होणारा त्रास हा महिलांच्या पायात बेडय़ा अडकविण्यासारखाच प्रकार आहे.
शैलजा गिरकर, माजी उपमहापौर
* बाळासाहेबांनंतर शिवसेना आता केवळ राजकारण करीत आहे. शिवसेना-भाजप युती राज्यात रामराज्य आणण्याच्या घोषणा करते. पण रामाच्या आदेशाचे पालन करण्याचा त्यांना विसर पडला आहे. नगरसेविकांना त्रास देणारे घोसाळकर यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी व्हायला हवी होती.
वकारुन्नीसा अन्सारी, काँग्रेस नगरसेविका
* सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर येऊ लागल्या आहेत. पण अनेक पुरुष ते स्वीकारण्यास तयार नाहीत. महिलांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. महिलांचे स्वातंत्र्य केवळ कागदावरच अस्तित्वात आहे. महिलांना आरक्षण मिळाले, पण संरक्षण नाही, अशी परिस्थिती आहे.
डॉ. सईदा खान, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका
* राजकारणात आलेल्या महिलांचे नेत्यांकडून खच्चीकरण होऊ लागले आहे. राजकारणात उच्चशिक्षित महिला पारदर्शकपणे आणि वेगाने काम करीत असून त्यांच्यावर नेते दबाव टाकत आहेत. पण, आता महिलाही गप्प बसणार नाहीत.
पारुल मेहता, काँग्रेस नगरसेविका
* आपल्या पक्षांतील नगरसेविकांना शिवसेना आमदार विनोद घोसाळकर मानसिक त्रास देत आहेत. मग सर्वसामान्य नागरिकांबरोबर ते कसे वागत असतील? उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.
मीरा कामत, समाजसेविका
* राजकीय पक्षांनी लैंगिक अत्याचार समित्या नेमणे गरजेचे आहे. महिलांना कुठेही निर्भयपणे जाता आले पाहिजे. महिलांना चारित्र्यहननाची मोठी भीती असते. अशा समित्या नेमल्या तर महिलांना निर्भयपणे काम करता येईल.
ज्योती म्हापसेकर, समाजसेविका
* विनोद घोसाळकर साध्याभोळ्या शिवसैनिकांची दिशाभूल करीत आहेत. शीतल म्हात्रे यांची विचारपूस करायला रुग्णालयात जाऊ नका, असे आदेशच त्यांनी स्थानिक शिवसैनिकांना दिले आहेत. हा आदेश स्थानिक नेतृत्वाचा आहे, पक्षप्रमुखांचा नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे लोकांचा आदर राखून आम्ही काम करीत राहणार.
शुभा राऊळ, असुरक्षित नगरसेविका
* शिवसेनेत आपल्यापेक्षा कुणीही वरचढ होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांचे पंख कापण्यात घोसाळकर यांचा हातखंडा आहे. ते अतिशय निंदनीय आणि विकृत राजकारण करीत आहेत. सच्चा शिवसैनिकांनी हातात बांगडय़ा घातल्या नसतील तर त्यांनी या नगरसेविकांच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, पण त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे या भागात शिवसेनेची ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत.
संजय घाडी, मनसे नेता
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
अभय कुणाला? महिला नगरसेविकांना की मस्तवाल नेत्याला?
शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या जाचाला कंटाळून रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे

First published on: 17-01-2014 at 06:27 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security is for women corporator or bad leaders