भरधाव वेगातील स्कूल व्हॅन आणि एस.टी. मिनिबसच्या धडकेत नवसारीजवळ चार चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा थरकाप उडवून देणारा अपघात मंगळवारी सकाळी अमरावतीजवळ घडल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही धडक विद्यार्थी बसलेल्या नेमक्या मागील भागात बसली आणि कोंबून भरलेल्या १४ शाळकरी मुलांच्या जीवावर बेतणारा प्रसंग घडला. तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सर्व मुले गंभीररीत्या जखमी झाले. या अपघाताने अनेक प्रश्न उभे केले आहेत. अमरावती शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. या सर्व शाळा शहरापासून दूर अंतरावर आहेत. इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शहराच्या ३० किलोमीटरच्या परिघातील अनेक गांवामधील पालकांनीही आपल्या मुलांसाठी या शाळांची निवड केली. सकाळी शाळेत वेळेत पोहोचवून देण्यासाठी स्कूल व्हॅनचालकांची लगबग दररोज पहायला मिळत असूनही इलाज नसल्यागत खासगी वाहनांची ही व्यवस्था असंख्य पालकांनी मान्य केली आहे. शहरात यापूर्वी स्कूल व्हॅन आणि ऑटोरिक्षांचे लहान-सहान अपघात घडले आहेत, पण मंगळवारी घडलेला अपघात हा स्कूल व्हॅनचा अलीकडच्या काळातला सर्वात भीषण अपघात आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मंगळवारी हजारो गावकऱ्यांनी पाहिला. या अपघाताने अमरावती शहरालगतच्या वलगाव, खारतळेगाव, कुंड सर्जापूर या गावांमध्ये शोक आणि संतापाचे वातावरण आहे.
अपघातस्थळीही थरकाप उडवून देणारे दृश्य अनेकांनी पाहिले. जखमी चिमुकल्यांना वाहनांच्या बाहेर काढताना अनेकांचे हात थरथरले. अनेकांना रडू कोसळले. काहींनी बसवर दगडफेक करून संतापाला मोकळी वाट करून दिली. एक वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील स्कूल व्हॅनचालकांची एक बैठक बोलावून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांनी स्कूल व्हॅन्सचा रंग एकच असावा, यासाठी सर्व गाडय़ांवर पिवळा रंग देण्यास वाहनमालकांना भाग पाडले, पण एका वर्षांतच एका स्कूल व्हॅनचालकाने वेगळा रंग दाखवला.
या अपघातासाठी दोन्ही वाहनांचा अत्याधिक वेग कारणीभूत मानला जात आहे. पोलीस प्रशासनाने स्कूल व्हॅनमधून दहा मुलांना बसवण्यास परवानगी दिली
आहे, पण अपघातग्रस्त व्हॅनमधून तब्बल १४ मुले प्रवास करीत होती. या स्कूल व्हॅनची ही दुसरी फेरी होती. विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देण्यासाठी घाईत वाहनांचा वेग वाढवणे, हे स्कूल व्हॅनचालकांच्या अंगवळणी पडलेले असले, तरी या अपघाताने यामागील धोका निदर्शनास आणून दिला आहे. केवळ वाहनांना पिवळा रंग दिल्याने शिस्त लागणार नाही, तर वाहनचालकांना प्रशिक्षण द्यावे लागेल, असे बोलले जाऊ लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
भरधाव वेगातील स्कूल व्हॅन आणि एस.टी. मिनिबसच्या धडकेत नवसारीजवळ चार चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा थरकाप उडवून देणारा अपघात मंगळवारी सकाळी अमरावतीजवळ घडल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

First published on: 29-11-2012 at 02:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security of school childrens question making troubled once again