मोठय़ा संघर्षानंतर शासनाने व जलसंपदा विभागाने लाभक्षेत्रातील शेतक-यांची पाणी सोडून तात्पुरती बोळवण केली असून या पाण्यातून गोदावरी उजवा व डावा तट कालवा तसेच नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या लाभक्षेत्रातील खरीप पिकाबरोबरच पाझर तलाव, गाव तलाव, के. टी. वेअर तसेच साठवण बंधारे भरून द्यावे, अशी मागणी आमदार अशोकराव काळे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
सध्या गोदावरी खो-याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने मागील १५ दिवसांपासून गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असून जवळजवळ ७ टीएमसी पाणी वाहून गेले आहे. सध्या गोदावरी कालव्यांना व नांदूर मधमेश्वर जलद कालव्याला पाणी सोडलेले असून या पाण्यातून खरिपाच्या पिकाबरोबरच तालुक्याचे दक्षिण भागातील रांजणगाव देशमुख व इतर ६ गावांचा पाणीप्रश्न अजूनही गंभीर असल्याने गोदावरी उजवा तट कालव्याचे ओव्हरफ्लोच्या पाण्यातून उपसा सिंचन योजना रांजणगाव देशमुख (उजवी चारी) या योजनेच्या माध्यमातून धोंडेवाडी व इतर पाझर तलावात पाणी सोडल्यास परीसरातील पाणी प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होणार असून मतदार संघातील पाझर तलाव, गाव तलाव, के. टी. वेअर तसेच साठवण बंधारे भरून द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.