मलकापूर नगरपंचायतीच्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने हाताच्या चिन्हावर सर्व सतराही जागा जवळपास एकतृतीयांश मताधिक्याने जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या घवघवीत यशाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवर काँग्रेसजनांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व निवडक मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत परवा गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ७ वाजता विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी सभेसंदर्भातील प्रसिद्धिपत्रकात निमंत्रितांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील हेही निमंत्रित आहेत.
मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सांगलीतील विजयाचा पॅटर्न राबवून काँग्रेसने १७ विरुद्ध शून्य असा दणदणीत विजय मिळवला. काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर ब-याच कालांतराने पक्षाच्या अधिकृत चिन्हावर हा निर्णायक विजय प्राप्त झाला आहे. या पार्श्र्वभूमीवर गुरुवारी आयोजित विजयी सभेत या विजयाचे किमयागार ठरलेले तसेच उच्चांकी मते व सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेले मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, विजयी उमेदवार नगराध्यक्ष शारदाताई खिलारे, गटनेते हणमंतराव जाधव, राजेंद्र प्रल्हाद यादव यांच्यासह सर्व सतराही उमेदवारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार जयकुमार गोरे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, मदनराव मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे.