स्थायी समितीवर आपली वर्णी लावण्यासाठी चाललेली चुरस अखेर संपुष्टात येऊन मंगळवारी मनसेच्या चार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी केली.
फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली. त्यानंतर एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सात सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले. यात मनसेचे चार तर राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा समावेश होता. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.
आचारसंहिता तसेच अन्य काही कारणास्तव ही निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. बऱ्याच कालापव्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. मनसेकडून रुची कुंभारकर, गणेश चव्हाण, सतीश सोनवणे, अर्चना थोरात, अनिल मटाले, नीलेश शेलार, रत्नमाला राणे, शीतल भामरे, सुनीता गायकवाड इच्छुक होते; तर राष्ट्रवादीत विनायक खैरे, निलीमा आमले, सुनीता शिंदे, रुपाली गांवड, शोभा आवारे, छाया ठाकरे, रंजना पवार यांच्यात चुरस होती.
सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात मनसेकडून अ‍ॅड. राहुल ढिकले, शीतल भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अर्चना थोरात यांची तर राष्ट्रवादीकडून शोभा आवारे, राजेंद्र महाले, रुपाली गांवड यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली. निवडीनंतर नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवड प्रक्रियेस सभागृह नेते शशिकांत जाधव, विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, मनसेचे गटनेते अशोक सातभाई, काँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.