लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्याचे सूतोवाच केल्यानंतर लगेचच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विकास कामांवरून टीका करून खासदार सदाशिवराव मंडलिक चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानावरून कोल्हापूर जिल्ह्य़ात खळबळ उडाली असली तरी त्याचे पडसाद राजधानी मुंबईत उमटत आहेत. मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडल्यावर आमदार महादेवराव महाडिक यांनी मंडलिक यांची भूमिका कशी चुकीची आहे, याचा पाढा वाचण्यास सुरूवात केली. पण महाडिकांवर पलटवार करीत मंडलिक यांनी वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवलेल्यांनी मला शहाणपण शिकवू नये असा टीकात्मक पवित्रा घेतला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागल्याने मंडलिक अडचणीत येऊ नयेत असे वाटल्याने त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील समर्थनार्थ पुढे सरसारवले आहेत. हा वाद सुरू असतांनाच सदाशिवराव मंडलिक, कामगारमंत्री हसन मुश्रीफ या एकेकाळच्या गुरू-शिष्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा रंगू लागला आहे. या घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील राजकारणाचा नूर कडाक्याच्या थंडीत तापू लागला आहे.     कोल्हापूर जिल्ह्य़ातील लोकसभेच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पातळीवरील पथक नुकतेच येऊन गेले. त्या बैठकीस खासदार मंडलिक उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र गेल्या आठवडय़ात काँग्रेस कमिटीत बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतांना पुढील निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चितपणे असेल, असे सूतोवाच त्यांनी केले होते. खासदार मंडलिक हे गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करून अपक्षपणे निवडून आले होते. अलीकडे ते काँग्रेस पक्षात रुळले असून त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदही सोपविण्यात आले आहे. स्पष्ट वक्ते म्हणून मंडलिक यांचा जिल्ह्य़ाच्या राजकारणाला परिचय आहे. कोल्हापुरातील थेट पाणी योजना,विमानतळ यासह अनेक विकासकामे राज्य शासनाकडे लटकत राहिली आहेत. त्याची सोडवणूक करण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अपयशी ठरल्याची कडवी टीका त्यांनी केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला झाल्याने हा घरचा आहेर मानला जात आहे.
खासदार मंडलिक यांच्या विधानानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांना समजुतीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला. मंडलिकांच्या विधानामुळे मुख्यमंत्री, पक्षाची बदनामी होत असल्याने त्यांनी अशी कृती करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. आमदार महाडिक करायला गेले एक पण झाले भलतेच.मंडलिकांनी महाडिक यांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्यांच्यावरच टीकेची झोड उठविली. अनेक पक्ष फिरून आलेल्या महाडिकांनी मला पक्षशिस्त शिकविणे म्हणजे मोठा विनोद आहे, असे म्हणत महाडिकांच्या पक्ष शिस्तीच्या सल्ल्याला मंडलिक यांनी गौण ठरविले आहे.लोकसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार असल्याने मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीवर पक्षातील जबाबदार खासदारांकडून टीका होऊ लागली तर ती पुढील राजकारणाच्यावेळी अडचणीची येण्याची शक्यता आहे. हे गृहीत लक्षात घेऊन मंडलिक यांच्याविषयी सहानुभूती ठेवणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बचावासाठी पुढे आले आहेत. अर्थात यामागे कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीची समीकरणे गुंतलेली आहेत. महाडिक, पी.एन.पाटील यांच्या गोकुळवरील वर्चस्वाला शह देण्यासाठी सतेज पाटील यांना मंडलिक यांच्या मदतीची गरज लागणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी खासदार मंडलिक यांची भेट घेऊन त्यांनी संयमाने विधान करावे, याविषयी आवाहन करणार असल्याचे सांगितले आहे. मंडलिक-पाटील यांच्यात भेट झाली तर स्पष्ट वक्ते मंडलिक त्यांचा सल्ला कितपत ऐकणार हाही प्रश्न उरतोच. मंडलिक यांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकात्मक विधानाने कोल्हापुरातील काँग्रेस अंतर्गत राजकारण मात्र ढवळून निघाले.हा वाद सुरू असतांनाच खासदार मंडलिक यांनी त्यांचे पूर्वाश्रमीचे शिष्य कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ असणार नाहीत. त्यांच्या पराभवाचा चोख बंदोबस्त मी केला आहे, असे आव्हानच मंडलिक यांनी व्हनाळी (ता.कागल) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केले होते. मुश्रीफ गैरमार्गाने कामे करून घेत असल्याने ते त्यांच्या मंत्रिपदाला शोभणारे नाही. त्यांच्या दडपशाही प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत केले जाईल, असे मंडलिकांचे म्हणणे होते. त्यावर मुश्रीफ यांनीही मंडलिक यांच्यावर पलटवार केला आहे. माझ्या आमदारकीची काळजी करण्यापेक्षा मंडलिकांनी अगोदर येणाऱ्या लोकसभेत आपले काय होणार याची चिंता पहावी, असा टोला लगावत माझ्या विधानसभा विजयासाठी मी समर्थ आहे, असे नमूद करीत मंडलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरू आहेत, ते पाहता लोकसभेची निवडणूक मंडलिक-मुश्रीफ या कडव्या प्रतिस्पध्र्याच्यात रंगणार का याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. या साऱ्या घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकीय आखाडय़ात चांगलीच खडाखडी जुंपल्याचे दिसत आहे.