येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दोन प्राध्यापकांना एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील एका विद्यार्थिनीने सहा महिन्यापूर्वी तिच्यावरील अत्याचाराची तक्रार केली होती.
स्त्री अध्ययन विभागात शिकणाऱ्या या मुलीने साहित्य विभागातील प्रा.अरुणेश शुक्ला हे आपला शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार स्त्री अध्ययन विभागातील प्रा. शरद जयस्वाल यांच्याकडे केली होती, मात्र जयस्वाल यांनी याप्रकरणी कानाडोळा केला. शेवटी त्या मुलीने विद्यापीठाच्या वरिष्ठांकडे धाव घेतली. विद्यापीठ प्रशासनाने महिला उत्पिडित विरोधी समितीकडे हे प्रकरण चौकशीसाठी दिले. त्या चौकशीत मुलीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यावर लैंगिक शोषण करणाऱ्या प्रा.शुक्ला व त्याला पाठिशी घालणारे प्रा.जयस्वाल या दोघांनाही निलंबित करण्याची कारवाई झाली. प्रशासनाने यासंदर्भात अधिक बोलणे नाकारले. हे दोन्ही प्राध्यापक मूळचे उत्तरप्रदेशातील असून विद्यापीठात काही वषार्ंपासून कार्यरत होते.